वीज जोडणीसाठी ब्राह्मणगावच्या ग्रामस्थांचे साखळी उपोषण
ग्राहकांनी कोटेशन भरूनही वीजपुरवठा रखडला नवीन ट्रान्सफॉर्मर व एलटी लाईनचे काम तातडीने करण्याची मागणी परभणी, १५ सप्टेंबर (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथील नवीन वस्ती तथा गावठाणातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासू
वीज जोडणीसाठी ब्राह्मणगावच्या ग्रामस्थांचे साखळी उपोषण


ग्राहकांनी कोटेशन भरूनही वीजपुरवठा रखडला

नवीन ट्रान्सफॉर्मर व एलटी लाईनचे काम तातडीने करण्याची मागणी

परभणी, १५ सप्टेंबर (हिं.स.) : जिंतूर तालुक्यातील मौजे ब्राह्मणगाव येथील नवीन वस्ती तथा गावठाणातील वीजपुरवठ्याचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून एलटी लाईनचे काम पूर्ण करावे आणि वीज जोडणी तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी नवीन वस्तीतील ग्रामस्थांच्या वतीने जिंतूर तहसील कार्यालयासमोर शांततामय साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

नवीन वस्तीतील ३१ ग्राहकांनी वीज जोडणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरली आहे. संबंधित कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली आहे. मात्र, अद्याप नवीन ट्रान्सफॉर्मर बसविणे, एलटी लाईन उभारणे आणि प्रत्यक्ष वीज जोडणी देण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही वीजपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही काम रखडले

वीजपुरवठ्याच्या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. २९ जुलै, ५ ऑगस्ट, १४ ऑगस्ट, १७ ऑगस्ट तसेच ३ सप्टेंबर २०२६ रोजी अर्ज व स्मरणपत्रे सादर करून प्रलंबित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, वारंवार निवेदने देऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.वीजपुरवठ्याअभावी नवीन वस्तीतील रहिवाशांना दैनंदिन जीवनात विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांच्या गैरसोयी वाढल्या आहेत. वीज नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासह घरगुती कामे आणि शेतीशी संबंधित कामांवरही परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

प्रशासन आणि महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. या आंदोलनादरम्यान नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविणे, एलटी लाईनचे काम पूर्ण करणे आणि कोटेशनची रक्कम भरलेल्या ३१ ग्राहकांना वीज जोडणी देणे, या प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.याशिवाय प्रलंबित कामाची सद्यस्थिती आणि काम पूर्ण होण्याबाबतची लेखी माहिती देण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येणार आहे. हे आंदोलन शांततामय, अहिंसक आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. प्रशासन आणि महावितरणने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे आणि नवीन वस्तीतील नागरिकांना लवकरात लवकर वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande