
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी रुग्णालय परिसराची नियमित पाहणी केली. या पाहणीदरम्यान रुग्णालय परिसरात एक व्यक्ती गंभीर अवस्थेत आढळून आली.
परिस्थितीची तातडीने दखल घेत अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीस अपघात विभागात दाखल केले. तेथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून तातडीने उपचार करण्यात आले.
यानंतर पुढील उपचार व वैद्यकीय निरीक्षणासाठी संबंधित व्यक्तीस औषधवैद्यकशास्त्र विभागातील वॉर्ड क्रमांक ३३ मध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आवश्यक उपचार व देखरेख सुरू असून, रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या तत्परतेमुळे संबंधित व्यक्तीस वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. रुग्णालय परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिष्ठाता तसेच रुग्णालय प्रशासनाकडून नियमित पाहणी करण्यात येत असून, परिस्थितीनुसार तातडीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis