छ. संभाजीनगर : रेल्वे, विमानसेवेच्या विस्ताराला संथ गती
दुहेरीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण; विमानसेवा वाढविण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनवाढीसाठी महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे आणि विमानसेवेच्या विस्ताराला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभ
अ


दुहेरीकरणाचे ६० टक्के काम पूर्ण; विमानसेवा वाढविण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजीनगरच्या पर्यटनवाढीसाठी महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे आणि विमानसेवेच्या विस्ताराला अपेक्षित गती मिळत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले असून, जून २०२७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मात्र, दौलताबाद-छत्रपती संभाजीनगर पट्ट्यातील काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत.

छत्रपती संभाजीनगर-अंकाई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यास या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. मात्र, दौलताबाद ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान सुरू असलेल्या कामाला अपेक्षित वेग मिळत नसल्याने प्रकल्प पूर्ण होण्याबाबत प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

दरम्यान, ऑक्टोबरपासून अजिंठा, वेरूळसह शहर परिसरातील ऐतिहासिक आणि पर्यटनस्थळांवर पर्यटन हंगामाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरची हवाई कनेक्टिव्हिटी वाढविण्याची मागणी जोर धरत आहे.

मुंबईसाठी पूर्वीप्रमाणे थेट विमानसेवा सुरू करावी, तसेच उदयपूर आणि अहमदाबादसाठी नवीन विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी इंडिगोकडे करण्यात आली आहे. याशिवाय बंगळुरूसाठीच्या विमानफेऱ्यांमध्ये वाढ करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरला अधिकाधिक शहरांशी थेट रेल्वे व हवाई संपर्क मिळाल्यास पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही शहराची कनेक्टिव्हिटी मजबूत होऊन आर्थिक विकासाला फायदा होऊ शकतो.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande