
नंदुरबार, 15 सप्टेंबर (हिं.स.) राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व
न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोकअदालतीला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लोकअदालतीत तडजोडीने मिटविता येणारी दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण 2 हजार 307 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून, त्यातून एकूण 8 कोटी 50 लाख
रुपयांची तडजोड करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी
न्यायाधीस वरिष्ठ स्तर के.ए.नहार यांनी दिली आहे.
या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलेश आर. उगले, जिल्हा
न्यायाधीश-1 ए. एच. सय्यद, जिल्हा न्यायाधीश-2 ए. के. काळे, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम. बी.
पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल ए. नहार, मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एन.
भावसार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर बी. बी. चौहान, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही. बी.
शितोळे, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी. डी. भिर्डे, व एच. वाय. पठाण तसेच नंदुरबार जिल्हा वकील
संघाचे अध्यक्ष अॅड. मनोजकुमार मोरे, उपाध्यक्ष अॅड. मनोज वळवी यांच्यासह विविध न्यायिक
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लोकअदालतीमध्ये कर्ज प्रकरणे व मोटार वाहन अपघात दाव्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही तडजोड
करण्यात आली. तसेच प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे परस्पर सामंजस्याने निकाली काढण्यात आली. राष्ट्रीय
लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार न्या. उगले यांनी सर्व
संबंधित अधिकारी, कर्मचारी, विधिज्ञ व पक्षकारांचे अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर