लातूर पोलिसांच्या श्वान पथकात ‘शक्ती’ची दमदार एन्ट्री; स्फोटक शोध मोहिमेसाठी होणार सज्ज
लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर पोलीस दलाच्या श्वान पथकाच्या क्षमतेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा ‘शक्ती’ हा स्फोटक शोधक श्वान लातूर पोलीस दलात दाखल झाला आहे. श्वान पथकाची स्थापना २००७ मध्ये झाल्यापासून प्रथमच या जाती
पोलीस अधिक्षक अमोल तांबे


लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर पोलीस दलाच्या श्वान पथकाच्या क्षमतेत आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा ‘शक्ती’ हा स्फोटक शोधक श्वान लातूर पोलीस दलात दाखल झाला आहे. श्वान पथकाची स्थापना २००७ मध्ये झाल्यापासून प्रथमच या जातीचा श्वान लातूर पोलिसांच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी या श्वानचे ‘शक्ती’ असे नामकरण केले. श्वान पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, तसेच शक्तीचे हँडलर पोलीस अंमलदार प्रदीप भालेकर आणि संजय जगताप यांनी त्याला पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासमोर हजर केले.‘शक्ती’ सध्या अवघ्या तीन महिन्यांचा असून, वयाची सहा महिने पूर्ण झाल्यानंतर त्याला स्फोटक पदार्थ शोधण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो लातूर जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

बेल्जियन मॅलिनॉइस ही अत्यंत हुशार, चपळ, ऊर्जावान आणि प्रशिक्षणास योग्य जात मानली जाते. वास घेण्याची क्षमता, वेग, चपळता आणि आदेशानुसार काम करण्याची क्षमता यामुळे या जातीच्या श्वानांचा सुरक्षा व पोलीस कामकाजात वापर केला जातो.विशेष प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शक्तीचा वापर स्फोटक पदार्थांचा शोध घेण्यासाठी केला जाणार आहे. गणेशोत्सव, मोठ्या सार्वजनिक सभा, महत्त्वाचे कार्यक्रम, व्हीआयपी दौरे, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात सुरक्षा तपासणी करताना त्याची मदत घेतली जाऊ शकते.संशयास्पद वस्तू, बॅग, वाहने किंवा कार्यक्रमस्थळांची तपासणी करताना प्रशिक्षित स्फोटक शोधक श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शक्तीच्या समावेशामुळे लातूर जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार आहे.

२००७ नंतर प्रथमच बेल्जियन मॅलिनॉइस

लातूर पोलीस दलाच्या श्वान पथकाची स्थापना सन २००७ मध्ये झाली. तेव्हापासून विविध प्रकारच्या पोलीस कामकाजासाठी श्वान पथक कार्यरत आहे. मात्र, २००७ नंतर प्रथमच बेल्जियन मॅलिनॉइस जातीचा श्वान लातूर पोलीस दलात दाखल झाला आहे. त्यामुळे शक्तीचे आगमन श्वान पथकाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.श्वान पथकातील अधिकारी आणि हँडलर्सच्या देखरेखीखाली शक्तीचे संगोपन व प्राथमिक प्रशिक्षण सुरू राहणार असून, सहा महिन्यांचे वय पूर्ण झाल्यानंतर त्याला विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande