
परभणी, १५ सप्टेंबर (हिं.स.) : अलिकडील काही वर्षांत कुटुंबातील सदस्यांमधील संवाद कमी झाल्याने मोठ्या प्रमाणावर समज-गैरसमज निर्माण होत आहेत. त्याचा परिणाम परस्परांमधील आस्था, प्रेम आणि जिव्हाळा कमी होण्यावर होत असून, अनेक कुटुंबांमध्ये विनाकारण दुरावा निर्माण होत आहे. काही ठिकाणी केवळ संवादाअभावी कुटुंबे कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे मत पु.श्री. समाधानजी महाराज शर्मा यांनी व्यक्त केले.
श्री सत्यनारायण कालानी स्मृती सेवा ट्रस्टच्या वतीने कृषि विद्यापीठातील सभागृहात आयोजित २६व्या सेवागौरव पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ समाजसेवक अनिलजी लुनिया यांना ट्रस्टचा ‘सेवागौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक मनोज लुहिया होते.
संवादातूनच कुटुंब व्यवस्था मजबूत
पु.श्री. समाधानजी महाराज शर्मा यांनी कुटुंब व्यवस्था कोलमडत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. कुटुंबातील सदस्यांमध्ये संवाद सातत्याने कमी होत असल्याने समज-गैरसमज वाढत आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होऊन एकमेकांमधील आस्था, प्रेम आणि जिव्हाळा कमी होत आहे. परिणामी कुटुंबातील दुरावा वाढत असून, काही कुटुंबे अक्षरशः कोलमडत आहेत.
प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी परस्परांशी चांगला संवाद ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कुटुंब व्यवस्था ही संवादावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनातही परिवार, नातेवाईक आणि आप्तेष्टांमध्ये सलोखा, आस्था व प्रेम टिकवण्यासाठी प्रत्येकाने संवादाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
पौराणिक आणि ऐतिहासिक काळातील अनेक ग्रंथांची निर्मितीही संवादातूनच झाली आहे. श्रीकृष्ण-अर्जुन संवादातून भगवद्गीतेची निर्मिती झाली, हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
विवाह व्यवस्थेवरही व्यक्त केली चिंता
आजच्या विवाह व्यवस्थेबाबतही पु.श्री. समाधानजी महाराज शर्मा यांनी परखड मत व्यक्त केले. लग्नासाठी शासकीय नोकरीतील मुलगा हवा, आयआयटीचे शिक्षण असल्यास मोठे पॅकेज हवे, अशा अपेक्षा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. दुसरीकडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय विवाह करण्याचे प्रकारही वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
कुटुंब व्यवस्थेत ज्येष्ठांना मोठे स्थान आहे. त्यांचा सन्मान राखतानाच त्यांची सातत्याने काळजी घेणे, त्यांना काय हवे-नको याची विचारपूस करणे आणि त्यांची सेवा करणे ही कुटुंबातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. मात्र, या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. आयुष्यभर मुलाबाळांसाठी कष्ट घेतलेल्या आई-वडिलांना वृद्धापकाळात मुलांकडून वाईट अनुभव येणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंटरनेट’ऐवजी ‘इंटर नीट’ करा
इंटरनेटच्या युगात मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. “इंटरनेट ऐवजी इंटर नीट करा, रीलमध्ये जगण्याऐवजी रिअलमध्ये जगा,” असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमंतीच्या मागे धावताना कुटुंबातील आपुलकीचे नाते गमावू नका. इतरांकडून बदला घेण्याऐवजी “स्वतः बदला”, असा संदेशही त्यांनी उपस्थितांना दिला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis