पुणे : महापालिका अधिकाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून पाहणीचे आदेश
पुणे, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील नागरी समस्यांकडे केवळ कागदोपत्री पाहण्याऐवजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्
पुणे : महापालिका अधिकाऱ्यांना आता रस्त्यावर उतरून पाहणीचे आदेश


पुणे, १५ सप्टेंबर (हिं.स.) : शहरातील नागरी समस्यांकडे केवळ कागदोपत्री पाहण्याऐवजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून पाहणी करावी, असे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त आणि कनिष्ठ अभियंत्यांना प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळच्या सत्रात आपल्या कार्यक्षेत्रातील विविध भागांची पाहणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

या पाहणीदरम्यान रस्त्यांची अवस्था, नाले, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, अतिक्रमणे तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित समस्या यांची पाहणी करून त्याची नोंद करावी लागणार आहे. स्थानिक पातळीवर सोडविता येणाऱ्या समस्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे नागरिकांना किरकोळ नागरी समस्यांसाठी वारंवार महापालिका कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता कमी होण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी स्वतः परिसरात जाऊन समस्या ओळखून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

मुख्यालयाची मंजुरी आवश्यक असल्यास तातडीने कळवावे

एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी महापालिका मुख्यालयाची मंजुरी किंवा अतिरिक्त साधनसामग्रीची आवश्यकता असल्यास त्याची माहिती संबंधित विभागप्रमुखांना तातडीने देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच संबंधित समस्या सोडविण्यापूर्वी आणि निराकरण केल्यानंतरचे छायाचित्र किंवा व्हिडिओ पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणीपासून ते समस्या निकाली काढण्यापर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे.

साप्ताहिक अहवाल आयुक्तांकडे सादर करणार

दरम्यान, प्रत्येक आठवड्यात करण्यात आलेल्या क्षेत्रभेटी आणि त्यानंतर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल दर शुक्रवारी आयुक्तांकडे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी दर आठवड्याला स्वतंत्र ‘गुगल शीट’ भरावी लागणार आहे.

या व्यवस्थेमुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या पाहणीबरोबरच संबंधित समस्यांच्या निराकरणाची जबाबदारी निश्चित होणार असून, त्यावरील कार्यवाहीचे दस्तऐवजीकरणही केले जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरी समस्या अधिक वेगाने सोडविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande