
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपुरात भाविकांसह वाहनांची संख्या सातत्याने वाढत आहे. वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करून शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत नऊ रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा तसेच दोन नवीन पुलांच्या बांधकामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामांसाठी सुमारे ४९३ कोटी ६६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सर्व कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
चंद्रभागा नदीवर जुन्या दगडी पुलाजवळ तसेच मुंढेवाडी येथे दोन नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. या पुलांमुळे नदीपैलतीरावरील पंढरपूरच्या विस्ताराला चालना मिळण्याबरोबरच शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कॉरिडॉरच्या कामांसोबतच शहरातील रस्ते विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे. पंढरपूर शहराभोवती प्रस्तावित रिंग रोडला जोडणारे विविध ‘कनेक्टिंग रोड्स’ विकसित करण्यात येणार आहेत.
ही सर्व कामे चालू वर्षाच्या बजेट बुकलेटमध्ये समाविष्ट असून, त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या आराखड्यातील क्षेत्रनिहाय रस्ते विकासामुळे राष्ट्रीय महामार्ग एनएच-९६५ (पुणे-पंढरपूर), एनएच-५६१ए तसेच राज्य महामार्गांशी संपर्क अधिक सक्षम होणार आहे. परिणामी आंतरजिल्हा प्रवासाचा वेळ कमी होण्याबरोबरच वाखरी, पाखलपूर, गोपाळपूर, टाकळी आणि कासेगाव या परिसरांना परस्परांशी जोडण्यास मदत होणार आहे. भाविकांची वाढती संख्या, शहराचा विस्तार आणि भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन रस्ते व पुलांची ही कामे महत्त्वाची ठरणार आहेत. प्रस्तावित प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड