
पावसाअभावी लातूर जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती
लातूर, 15 सप्टेंबर (हिं.स.) : पावसाने ओढ दिल्यामुळे लातूर जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक असून, सरकार या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत आहे. जिल्ह्यातील अनेक भागांना भेटी देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली असून, शेतकरी आणि शेतमजुरांसमोरील अडचणी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत, अशी माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले आहे. पावसाने आणखी दडी मारल्यास शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले, “पावसाच्या अभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार निर्णय घेईल. लातूर जिल्ह्यातील अनेक भागांना भेटी दिल्या असून, परिस्थिती चिंताजनक आहे. सरकार या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत आहे.”
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर आगामी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. परिस्थितीची गरज लक्षात घेऊन शासनाकडून योग्य निर्णय घेतला जाईल. शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सरकारची भूमिका असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. “गरज भासल्यास काही विकासात्मक कामे बाजूला ठेवून सर्वसामान्य शेतकरी आणि शेतमजुरांच्या हिताचा नक्कीच विचार केला जाईल, असेही सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीत लातूर जिल्ह्यासह पावसाअभावी प्रभावित भागांसाठी शासन कोणते निर्णय घेते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.----------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis