
सोलापूर, 15 सप्टेंबर (हिं.स.)।गेल्या साडेतीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने मोहोळ तालुका गडद दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. विहिरी आणि बोअरवेलचे पाणी तळाला गेले असून, चारा टंचाईही तीव्र झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे मोहोळ तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जूनपासून पावसाळा सुरू होऊन सप्टेंबर उजाडला, तरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे. पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
चाऱ्याची उपलब्धता राहावी, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड केली होती. मात्र पाऊस न झाल्याने मका पिके जळून गेली. त्यामुळे तालुक्यात तीव्र चारा टंचाई निर्माण झाली असून, त्याचा थेट फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. चाऱ्याअभावी दूध उत्पादन निम्म्यावर आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भविष्यात पाऊस होईल, या आशेवर शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन, उडीद, मूग यासह विविध खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली असून, अनेक ठिकाणी संपूर्ण खरीप हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेऊन मोहोळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड