
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। विविध सण-उत्सव आणि २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये हा आदेश लागू करण्यात आला असून, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी त्याबाबत आदेश जारी केला आहे.
हा आदेश १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या काळात विविध सण, उत्सव, जयंती-पुण्यतिथींमुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून मोर्चे, धरणे, निदर्शने, उपोषणे किंवा बंदची आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.मनाई आदेशाच्या कालावधीत दाहक किंवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ, दगड, शस्त्रे-अस्त्रे, फेकण्यासाठी वापरता येणारी हत्यारे, काचेचे तुकडे तसेच रिकाम्या काचेच्या बाटल्या बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध राहणार आहे.याशिवाय चाकू, सुरा, कोयता, तलवार, भाले, काठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू सोबत बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे अथवा मिरवणूक काढणे यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच आक्षेपार्ह घोषणा देणे, सभ्यता व नीतिमत्तेला धोका निर्माण करणारी भाषणे करणे किंवा कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारे कोणतेही कृत्य करण्यास मनाई आहे. शासकीय सेवेत असलेल्या व्यक्ती तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य बजावताना हत्यार बाळगणे आवश्यक असलेल्या व्यक्तींना या आदेशातून वगळण्यात आले आहे.मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३५ अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु