
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)।
विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या तिमाही बैठकीत पुणे जिल्ह्यातील दोन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली.
बैठकीस कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, समितीचे सदस्य सचिव तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक दर तीन महिन्यांनी, संबंधित महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी घेण्यात येते. या बैठकीत मागील तीन महिन्यांत समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींचा तसेच त्यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान संबंधित प्रकरणांतील अर्जदार तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी प्रकरणांवर सुनावणी घेतली.
समितीच्या माध्यमातून भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु