
पुणे, 15 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना आता कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (सीएसआर) थेट लाभ मिळणार आहे. यासाठी पुणे जिल्हा परिषदेने ‘सहयोग’ हे स्वतंत्र सीएसआर पोर्टल विकसित केले आहे. या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून कंपन्यांना त्यांच्या सीएसआर धोरणाशी सुसंगत असलेल्या गरजू आणि प्राधान्यक्रमातील प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा, पर्यावरण, क्रीडा आणि कौशल्य विकास यांसारख्या विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा या पोर्टलमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या सीएसआर निधीचा योग्य प्रकल्पांसाठी विनियोग करणे अधिक सुलभ होणार आहे.
सध्या ग्रामीण विकासकामांसाठी सीएसआर निधी मिळविताना प्रशासन, कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांना स्वतंत्रपणे समन्वय साधावा लागतो. त्यामुळे वेळखाऊ प्रक्रिया आणि माहितीच्या अभावाच्या अडचणी निर्माण होतात. ही प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याच्या उद्देशाने ‘सहयोग’ पोर्टल विकसित करण्यात आले आहे.या पोर्टलमुळे जिल्ह्यातील गरजू प्रकल्पांची माहिती कंपन्यांपर्यंत थेट पोहोचण्यास मदत होईल. तसेच सीएसआर निधीचा अधिक नियोजनबद्ध पद्धतीने वापर करून ग्रामीण भागातील विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु