
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : सिद्धेश्वर घाटावरील कुंडातील पाणी घाण व दूषित असल्याची माहिती नागरिकांकडून मिळाल्यानंतर स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते यांनी तातडीने कुंडाची पाहणी केली. यावेळी पीएचई विभागाचे व्यंकटेश जी. चौबे, नगर अभियंता नीलकंठ मटपती, झोन अधिकारी गायधनकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली.
पाहणीदरम्यान कुंडातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पीएचई विभागाकडून पीएसई पावडर आणि तुरटीचा वापर करण्यात आला. तसेच काही कालावधीसाठी फाउंटन सुरू करून पाण्यात एरेशनची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
बाजूच्या तलावातून होणाऱ्या पर्कोलेशनमुळे कुंडातील पाण्याला हिरवट रंग आल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यामुळे पाण्याचा रंग पूर्णपणे बदलणे शक्य नसले, तरी त्यातील दूषिततेचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, कुंड परिसराची तातडीने स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि आरोग्याला प्राधान्य देत परिसरातील समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
-------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड