सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी गावाचा समावेश करण्याची मागणी, ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलन
सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी (ता. माढा) गावाचा समावेश करावा, या मागणीसाठी तुळशी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अनेक पिढ्या गेल्या असून, पाण्याअभावी शेकडो कुटुंब
Kurnur dam


सोलापूर, १५ सप्टेंबर (हिं.स.) : सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी (ता. माढा) गावाचा समावेश करावा, या मागणीसाठी तुळशी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. पाण्याच्या प्रतीक्षेत अनेक पिढ्या गेल्या असून, पाण्याअभावी शेकडो कुटुंबांना शहरांकडे स्थलांतर करावे लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

गावातील सुमारे २५० तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पर्जन्यवृष्टीसाठी विविध ठिकाणी गाढवांची लग्ने लावली जात असताना, ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’ असा उद्विग्न सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

ग्रामसभेत ठराव केल्यानंतर तुळशी येथील हनुमान मंदिरात आजपासून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. सरपंच डॉ. शरद मोरे यांच्यासह डिगंबर माळी, मनोज शहा, संजय लामकाने, सचिन खांडेकर, नारायण वाघमारे, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल गव्हाणे, रामचंद्र वाघमारे, मारुती वाघमारे आणि भारत जाधव असे ११ ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले आहेत.

सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी गावाचा समावेश व्हावा, यासाठी ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. यापूर्वी रास्ता रोको आंदोलन तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान उपोषण करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनांनंतर केवळ आश्वासनांपलीकडे ठोस कार्यवाही झालेली नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी अद्याप पुरेशी व्यवस्था नसल्याने गावातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने रोजगार आणि उपजीविकेच्या शोधात अनेक कुटुंबांना शहरांकडे स्थलांतर करावे लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

सीना-माढा उपसा सिंचन योजनेत तुळशी गावाचा समावेश करून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande