
रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा महामार्गावरील वाकेड (तालुका लांजा) घाटात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका अपघातग्रस्त मोटारीला दुसऱ्या मोठा विनोद धडक दिल्याने अपघात ग्रस्त मोटार जळून खाक झाली.
उभ्या असलेल्या ऑरा कारला स्कॉर्पिओने जोरदार धडक दिल्यानंतर ही आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी ऑरा कार (क्र. MH 48 GQ 3557) अपघातामुळे महामार्गाच्या कडेला उभी होती. त्याचवेळी गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारने (क्र. MH 47 BT 8006) उभ्या असलेल्या ऑरा कारला जोरदार धडक दिली. धडकेनंतर ऑरा कारने अचानक पेट घेतला. काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढा दिला आणि पाहता पाहता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून बेचिराख झाली. अपघातानंतर वाहनातील प्रवाशांनी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. सर्व प्रवासी सुखरूप बचावले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मारळकर, पोलीस अंमलदार नासिर नावळेकर, स्वप्नील कदम, विलास जाधव आणि सचिन बळीप यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच महामार्ग पोलिसदेखील हजर झाले. राजापूर नगरपरिषद अग्निशमन दलाच्या जवानांनीही तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाण्याचा मारा करून ऑरा कारला लागलेली आग आटोक्यात आणली.
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी