उदगीर ग्रामीणमध्ये १२५ गणेश मंडळांचे डीजेमुक्त विसर्जन
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२५ गणेश मंडळांनी डीजे आणि डॉल्बीला पूर्णपणे फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला उत्साहात आणि शांततेत निरोप दिला. गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद द
गणपती विसर्जन


लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२५ गणेश मंडळांनी डीजे आणि डॉल्बीला पूर्णपणे फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला उत्साहात आणि शांततेत निरोप दिला. गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत डीजेमुक्त विसर्जन मिरवणुका काढल्याबद्दल लातूर पोलीस दलाच्या वतीने मंडळांचे कौतुक करण्यात आले.

लातूर जिल्हा पोलीस दलाकडून यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गणेश मंडळांशी संवाद साधून डीजे-डॉल्बीच्या दुष्परिणामांची माहिती देत पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला प्रतिसाद देत उदगीर ग्रामीण हद्दीतील १२५ गणेश मंडळांनी डीजे-डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढल्या. त्यामुळे उत्सवाचा आनंद, शिस्त आणि पारंपारिक संस्कृतीचा सुंदर मिलाप पाहायला मिळाला. दरम्यान, उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उद्या ६९ पेक्षा अधिक गणेश मंडळांचे विसर्जन होणार आहे. या सर्व मंडळांनीही डीजे अथवा डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देत शांततेत, शिस्तीत आणि सुसंस्कृत पद्धतीने गणरायाला निरोप द्यावा, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

गेल्या वर्षभरात लातूर जिल्ह्यातील विविध सार्वजनिक कार्यक्रम डीजे-डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस दलाकडून जनजागृती करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नागरिकांना वारंवार आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

उदगीर ग्रामीण हद्दीतील १२५ गणेश मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या गजरात गणरायाला दिलेला निरोप इतर मंडळांसाठीही अनुकरणीय ठरला आहे. लातूर जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी डीजे अथवा डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देत गणेशोत्सव शांततेत आणि सुसंस्कृत वातावरणात साजरा करावा, असे आवाहन लातूर पोलीस दलाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande