
लातूर, 19 सप्टेंबर (हिं.स.)। लातूर शहरातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वाढीव पाणीपुरवठा योजना, नवीन जलवाहिन्या आणि जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासह विविध प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौर जयश्री सोनकांबळे यांनी पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केली आहे. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशीही मागणी करण्यात आली.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर, स्थायी समिती सभापती, गटनेते, आयुक्त आणि पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी लातूर शहरातील सुरू असलेली विकासकामे तसेच जिल्हा नियोजन समिती आणि शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विविध प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
लातूर शहरातील पाणीटंचाई आणि महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी काँग्रेस भवन येथे महापौर जयश्री सोनकांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले, मनपा गटनेते विजयकुमार साबदे तसेच नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी महापौर जयश्री सोनकांबळे यांनी सांगितले की, लातूर शहर सध्या अत्यंत गंभीर पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा करणे हे महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान बनले आहे. या परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठ्याचे जाळे मजबूत करणे, नवीन जलवाहिन्या टाकणे तसेच जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे तातडीचे आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लातूर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. यातील काही प्रस्ताव राज्य शासन स्तरावर तर काही जिल्हा नियोजन समितीकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
आमदार अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी, पाणीपुरवठा अभियंता गणेश देवणीकर यांच्यासह महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अॅड. स्नेहल उटगे, स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले आणि गटनेते विजयकुमार साबदे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. लातूर शहरासाठी प्रस्तावित अतिरिक्त पाणीपुरवठा उपाययोजनांना तातडीने मंजुरी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis