रत्नागिरी : भोस्ते घाटात रसायनाचा कंटेनर टँकर दरीत कोसळला
रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव केमिकल कंटेनर टँकर सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळला. अपघातात संपूर्ण टँकरचा चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने चालक बचावला आहे. ह
उलटल्यानंतर कंटेनर टँकरची झालेली अवस्था


रत्नागिरी, 19 सप्टेंबर (हिं.स.) । मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा भरधाव केमिकल कंटेनर टँकर सुमारे २५० फूट खोल दरीत कोसळला. अपघातात संपूर्ण टँकरचा चक्काचूर झाला असला, तरी सुदैवाने चालक बचावला आहे.

हा कंटेनर भोस्ते घाटाचा तीव्र उतार उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकर थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल दरीत कोसळला. वाहनावरील केमिकलची टाकी वेगळी होऊन सुमारे २५० फूट खाली आदळल्याने मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनाची झालेली दुरवस्था पाहता जीवितहानीची मोठी भीती व्यक्त केली जात होती; मात्र चालकाला केवळ किरकोळ दुखापती झाल्या असून तो सुखरूप बाहेर पडला.

घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून युद्धपातळीवर बचावकार्य राबवत पोलिसांनी चालकाला सुरक्षित बाहेर काढले आणि तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी कळंबोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वाहनात नेमके कोणते रासायनिक द्रव्य होते आणि त्यामुळे परिसरात काही धोका निर्माण होऊ शकतो का, याची खातरजमा करण्यासाठी घटनास्थळी आवश्यक खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.

दरम्यान, घाटातील उतारामध्ये ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज जात आहे. मात्र, अपघात वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे झाला की इतर काही कारण घडले, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, ती सुरळीत करण्याचे काम पोलीस यंत्रणेने पूर्ण केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande