
बीड, 19 सप्टेंबर (हिं.स.)। परळी शहराच्या पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा सभापती सौ. जयश्री रविंद्र गित्ते, गटनेते वैजनाथराव सोळंके, मुख्याधिकारी त्रिंबकजी कांबळे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक बाजीराव धर्माधिकारी, नगरसेवक लक्ष्मणजी मुरकुटे, राजाभैय्या पांडे, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र परदेशी व माजी नगरसेवक रमेश चौडे, नगर अभियंता ज्ञानेश्वरजी ढवळे यांनी नागापूर येथील नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी केली.
यावेळी प्रकल्पातील ब्लिचिंग व तुरटीचा उपलब्ध साठा, जलशुद्धीकरणाची सद्यस्थिती तसेच जुना WTP प्लॅन्ट आता अकार्यक्षम झाल्याने त्याचीही पाहणी करण्यात आली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील एअर वॉल्व्हची स्थिती देखील तपासण्यात आली.
तसेच प्रकल्प परिसरातील कर्मचारी निवासस्थानांचीही पाहणी करण्यात आली. निवासस्थानांची झालेली दुरवस्था पाहता आवश्यक दुरुस्ती व देखभालीबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.त्यानंतर वाण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
सध्या प्रकल्पात केवळ २० टक्के पाणीसाठा असून त्यापैकी अंदाजे १५ टक्केच पाणी उपयुक्त साठा आहे. विशेष म्हणजे अद्यापही वाण नदीला समाधानकारक पाणी आलेले नाही.या अत्यंत गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी लवकरच आवश्यक पाणी कपातीचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून प्रत्येक थेंबाचा योग्य वापर करण्याची गरज आहे.
दरम्यान, जलस्रोतांमधून होणाऱ्या अनधिकृत पाणीउपशाचा प्रश्नही गंभीरपणे उपस्थित करण्यात आला. उपलब्ध पाणीसाठा अत्यंत मर्यादित असताना अनधिकृत पाणीउपशावर प्रभावी कारवाई होत नसल्याबद्दल पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. परळी शहराच्या हक्काच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस व कठोर पावले उचलावीत, अशी स्पष्ट भूमिका यावेळी मांडण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis