अमरावती स्त्री रुग्णालय अग्निकांडाचा चौकशी अहवाल सादर
तीन नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषी कोण? कारवाईची टांगती तलवार; अहवाल लवकरच होणार सार्वजनिक अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेप्रकरणी शासनाने न
जिल्हा स्त्री रुग्णालय अग्निकांड : उच्चस्तरीय समितीचा अहवाल आरोग्य सचिवांकडे सुपूर्द


तीन नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोषी कोण? कारवाईची टांगती तलवार; अहवाल लवकरच होणार सार्वजनिक

अमरावती, 08 सप्टेंबर (हिं.स.) | अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील अग्निकांडात तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या गंभीर घटनेप्रकरणी शासनाने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने आपला अहवाल शासनाकडे सादर केला आहे. समितीने तयार केलेला सत्यशोधन अहवाल आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, या अहवालात नेमके कोण दोषी आढळले आणि कोणावर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे, याकडे संपूर्ण अमरावती जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागून तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा, विद्युत व्यवस्था तसेच संबंधित विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने त्याच दिवशी ११ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती.

समितीने घटनेची विविध अंगांनी चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, रुग्णालय प्रशासन तसेच सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. उपलब्ध कागदपत्रे, यंत्रणेची स्थिती आणि घटनेशी संबंधित बाबींची तपासणी केल्यानंतर समितीने आपला सत्यशोधन अहवाल तयार केला. हा अहवाल काल आरोग्य सचिव निपुण विनायक यांच्याकडे सादर करण्यात आला.

दरम्यान, अहवालात कोणत्या अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आले आहेत, कोणाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली आणि नेमकी कोणती कारवाई प्रस्तावित आहे, याची माहिती अद्याप अधिकृतपणे समोर आलेली नाही. त्यामुळे दोषारोप झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था, आपत्कालीन यंत्रणा आणि नवजात बालकांच्या विभागातील सुरक्षा उपाययोजनांबाबत समितीने शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी केल्याची माहिती आहे.दरम्यान, चौकशी अहवाल आज सार्वजनिक केला जाण्याची शक्यता आहे. अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर तीन नवजात बालकांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण, कोणत्या त्रुटी आढळल्या आणि दोषींवर कोणती कारवाई होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे मृत बालकांच्या कुटुंबीयांसह अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande