मुंबई, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि विचारांचा खूप मोठा वारसा आपल्याला लाभला आहे. महाराजांचे अजोड कार्य गड-किल्ल्यांच्या रूपाने आपण पहात असतो पण शिवकालीन कथा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अनुभवता येणारं एकमेव ठिकाण म्हणजे पुण्याजवळील शिवसृष्टी. विस्तृत परिसरात वसलेलं पुण्यातील शिवसृष्टी, आशियातील एकमेव ऐतिहासिक थीम पार्क असून ही जागा प्रत्येकासाठी मंत्रमुग्ध करणारा अनुभव देणारी आहे, विशेषतः क्रिएटर्ससाठी. (Creators) ज्यांना प्राचीन इतिहासाशी नाते जोडण्यासाठी आणि त्यांच्या कलेच्या अभिव्यक्तीसाठी एक अनोखे व्यासपीठ मिळते.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्यावतीने शिवसृष्टी रील महाकरंडक स्पर्धेचे २० ऑक्टोबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले असून, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. क्रिएटर्सना (Creators) त्यांच्या कलेचे प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळणार आहे, जिथे ते शिवसृष्टीतील अनोखा वारसा आणि संस्कृती रील्सच्या माध्यमातून जगासमोर सादर करू शकतील.
या स्पर्धेचे नेतृत्व प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर करीत असून, प्रमुख ब्रँड अॅम्बेसेडर प्रसिद्ध अभिनेता श्री. अजय पुरकर असतील. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त श्री.जगदीश कदम यांचे मार्गर्दर्शन यासाठी लाभले आहे. या स्पर्धेत विजेत्याला सन्मानचिन्ह आणि १ लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. तसेच, अनेक उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी लाखो रुपयांची पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ १० नोव्हेंबर २०२४ ला संपन्न होईल.
अधिक माहितीसाठी* ७८२०९२३७३७ /९५७९६२२४५६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर