
चेन्नई, 8 जानेवारी, (हिं.स.)। दाक्षिणात्य सुपरस्टार थलपती विजय यांचा अखेरचा चित्रपट म्हणून ओळखला जाणारा ‘जना नायकन’ सध्या सातत्याने चर्चेत आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतरच प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विजय यांच्या कारकिर्दीतील ही शेवटची सिनेमॅटिक कलाकृती असल्याने, या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटकडे चाहत्यांचे विशेष लक्ष होते. अशातच आता चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
‘जना नायकन’च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केले आहे की, या चित्रपटाचे प्रदर्शन सध्या पुढे ढकलण्यात आले आहे. आधी हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही अनपेक्षित आणि अपरिहार्य कारणांमुळे चित्रपट स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, चित्रपटाची नवी प्रदर्शन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.
केव्हीएन प्रोडक्शन्स या निर्मिती संस्थेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे, “जड अंतःकरणाने आम्ही ही सांगत आहोत की ९ जानेवारीला प्रदर्शित होणारा ‘जना नायकन’ काही आमच्या नियंत्रणाबाहेरील कारणांमुळे पुढे ढकलावा लागत आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा, भावना आणि उत्साहाबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे आणि हा निर्णय आमच्यासाठीही सोपा नव्हता. चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल. तोपर्यंत सर्वांनी संयम राखावा आणि आमच्यावर प्रेम व पाठिंबा कायम ठेवावा. तुमचे समर्थन हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे.”
या घोषणेनंतर आता चाहत्यांची नजर ‘जना नायकन’च्या नव्या प्रदर्शन तारखेकडे लागली असून, विजय यांच्या अखेरच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढताना दिसत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर