
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.)। या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या हॉरर-कॉमेडी चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘भूत बंगला’ संदर्भातील प्रेक्षकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. तब्बल १४ वर्षांनंतर हॉरर-कॉमेडीचा बादशाह दिग्दर्शक प्रियदर्शन आणि सुपरस्टार अक्षय कुमार यांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि त्यानंतर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमुळे ‘भूत बंगला’बाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
आता निर्मात्यांनी या चित्रपटाची अधिकृत प्रदर्शन तारीख जाहीर केली असून, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘भूत बंगला’ हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे, अशी घोषणा करण्यात आली आहे. हॉरर आणि कॉमेडीचा परफेक्ट मिलाफ असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रियदर्शन–अक्षय कुमार जोडीकडून अपेक्षित असलेले क्लासिक मनोरंजन देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत, “बंगल्यातून एक बातमी आली आहे! १५ मे २०२६ रोजी दरवाजे उघडतील… सिनेमागृहात भेटूया ‘भूत बंगला’मध्ये!” असे कॅप्शन दिले आहे.
या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याची दमदार स्टारकास्ट. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात तबु, परेश रावल, राजपाल यादव, जिशु सेनगुप्ता, असरानी आणि वामिका गब्बी यांसारखे लोकप्रिय कलाकार झळकणार आहेत.
चित्रपटाच्या महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण राजस्थान, जयपूर आणि हैदराबाद येथे करण्यात आले असून, त्यामुळे चित्रपटाला भव्य दृश्यात्मक रूप लाभले आहे. प्रियदर्शन यांच्या चित्रपटात अशी पॉवरहाऊस स्टारकास्ट एकत्र येणे म्हणजे प्रेक्षकांसाठी एका मोठ्या सिनेमाई धमाक्याची नांदी असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर