
नाशिक, 07 जानेवारी (हिं.स.)। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ललित कला केंद्राची निर्मिती असलेल्या “इथेच टाका तंबू” या प्रायोगिक नाटकाची कला क्षेत्रातील मानाचा समजल्या जाणाऱ्या मुंबई येथील *२५ व्या ‘काळा घोडा कला महोत्सव’*साठी निवड झाली आहे. काळा घोडा कला महोत्सवाचे समन्वयक श्री. रवी मिश्रा व श्री. भाविक शाह यांचे सदर निवडीचे अधिकृत पत्र विद्यापीठास प्राप्त झाले आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या ललित कला केंद्रामार्फत या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ललित कला केंद्राचे प्रा. दत्ता पाटील यांनी या नाटकाचे लेखन केले असून केंद्राचे संचालक श्री. सचिन शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. हे दोन अंकी प्रायोगिक नाटक असून, काळा घोडा कला महोत्सवांतर्गत दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नाट्यगृहात नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.
विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्य विकासाच्या विविध उपक्रमांसोबतच सांस्कृतिक क्षेत्रातही योगदान देण्याच्या उद्देशाने तसेच नाट्यशास्त्र शिक्षणक्रमाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व नामांकित कलावंतांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा मिळावी, या दृष्टीने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. या नाटकाची नुकतीच पद्मविभूषण रतन टाटा स्मरणार्थ मुंबई येथे झालेल्या “नाट्यरतन” या बहुभाषिक राष्ट्रीय नाट्यमहोत्सवासाठीही निवड झाली होती.
या नाटकात सुप्रसिद्ध अभिनेते उमेश जगताप, ओंकार गोवर्धन, आश्विनी कासार व अमेय बर्वे यांच्या भूमिका आहेत. नाटकाची प्रकाशयोजना प्रणव सपकाळे व निखिल मारणे यांनी केली असून नेपथ्य विक्रम नन्नावरे व प्रसाद चिने पाटील यांचे आहे. संगीत ऋषिकेश शेलार यांनी दिले असून संगीत संयोजन ऋषिकेश गांगुर्डे यांनी केले आहे. वेशभूषा अनिकेत खरे व कविता देसाई यांची आहे.
जगण्याची वाट चुकलेल्या एका मनस्वी तरुणाच्या परिवर्तनाची प्रक्रिया आणि त्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या विविध सामाजिक घटकांचे सूक्ष्म विश्लेषण या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. नाटकाच्या निर्मितीतील विविध तांत्रिक बाजू तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नाट्यशास्त्राचे आजी-माजी विद्यार्थी समर्थपणे सांभाळत आहेत. सलग दुसऱ्या नामांकित नाट्यकला महोत्सवासाठी या नाटकाची निवड झाल्याबद्दल विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नाटकाची उद्घोषणा अतुल कुलकर्णी यांच्या आवाजात
प्रायोगिक नाट्य चळवळीला सातत्याने पाठबळ देणारे सुप्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी “इथेच टाका तंबू” या नाटकाची संपूर्ण उद्घोषणा आपल्या दमदार आवाजात केली आहे. लेखक दत्ता पाटील आणि दिग्दर्शक सचिन शिंदे यांच्या “नाट्यचौफुला” या चार नाटकांच्या महोत्सवाचे आयोजनही श्री. अतुल कुलकर्णी यांनी मागील वर्षी केले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर