रत्नागिरी : रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेत अमन तांबोळी, प्रशांत तिडके,  योगेश्वरी कदम,  अनुप पवार प्रथम
रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक या आज झालेल्या सायकल स्पर्धेत खुल्या गटामध्ये सांगलीच्या अमन तांबोळी याने ४८ किमी अंतर फक्त १ तास १६ मिनिटांत पार करून विजेतेपद पटकावले.
सायक्लोथॉन १


सायक्लोथॉन २


रत्नागिरी, 20 ऑक्टोबर, (हिं. स.) : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक या आज झालेल्या सायकल स्पर्धेत खुल्या गटामध्ये सांगलीच्या अमन तांबोळी याने ४८ किमी अंतर फक्त १ तास १६ मिनिटांत पार करून विजेतेपद पटकावले. ५५ वर्षांवरील पुरुष गटात प्रशांत तिडके आणि महिला गटात योगेश्वरी कदम, मास्टर्स गटात अनुप पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली. सायकल स्पर्धेचा थरार सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरीकरांनी अनुभवला.

भाट्ये येथे प्रांताधिकारी जीवन देसाई व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धा सुरू झाली. भारत निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राबाहेरूनही १७० स्पर्धक सहभागी झाले. उद्घाटनप्रसंगी स्पर्धेचे आयकॉन, ज्येष्ठ सायकलपटू सतीश जाधव व रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेची संकल्पना पेडल फॉर बायोडायव्हर्सिटी अशी होती.

ही स्पर्धा १ तास ४१ मिनिटांत ३५ जणांनी पूर्ण केली. त्याबद्दल त्यांना रोलर कोस्टर चॅम्पियन किताब देऊन सन्मानित केले. सांगली येथील ८१ वर्षांचे सायकलिस्ट भीमराव सूर्यवंशी आणि मुंबईतील ६७ वर्षांच्या मंगला पै यांनी स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.

गेले चार-पाच दिवस पाऊस पडत होता, विजांचा गडगडाट सुरू होता. त्यामुळे स्पर्धेच्या नियोजनात थोडा अडथळा आला. परंतु शनिवारपासून पाऊस थांबला आणि क्लबच्या काटेकोर नियोजनामुळे स्पर्धा यशस्वी झाली, याबद्दल सर्वच स्पर्धकांनी समाधान व्यक्त केले. हॉटेल विवेक, सुवर्णसूर्य फाउंडेशन, लायन्स क्बब ऑफ रत्नागिरी, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंक, महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, भारत निवडणूक आयोग, जय हनुमान मित्रमंडळ, दीपक पवार, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक पोलिस आणि जिल्हा रुग्णालयाने रुग्णवाहिका देऊन बहुमोल सहकार्य केले.

विजेत्यांची गटनिहाय नावे -

एलाईट ग्रुप- प्रथम- अमन तांबोळी (सांगली वेळ 1.16.29), द्वितीय हनुमंत चोपडे (पुणे, 1.19.02) तृतीय सिद्धेश पाटील (कोल्हापूर वेळ 1.19.4). 55 वर्षावरील पुरुष गट- प्रथम प्रशांत तिडके (पुणे), द्वितीय मरीयन डिसुझा (मुंबई) आणि तृतीय आदित्य पोंक्षे (पुणे). महिला गट- प्रथम- योगेश्वरी कदम (सांगली, वेळ 1.36.01), द्वितीय निम शुक्ला (मुंबई, 1.36.03) आणि तृतीय साक्षी पाटील (सांगली, 1.36.05). मास्टर्स- प्रथम- अनुप पवार (मुंबई, वेळ 1.22.51) द्वितीय पंकज मार्लेशा (मुंबई, 1.35.09), आणि तृतीय प्रवीण पाटील (मुंबई, 1.36.16). विजेत्यांना १ लाख १० हजारांची बक्षिसे, ट्रॉफी, स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

थरारक वेग

सायकल स्पर्धेचा थरार सलग दुसऱ्या वर्षी अनुभवला. भाट्याचा चढाव, सपाटी, गोळपचा उतार, पावस बायपास रोडचा चढाव, वळणे, तीव्र उतार, गणेशगुळे फाट्यापर्यंत वळणावळणांचा चढणीचा रस्ता, गावखडीचा तीव्र उतार अशा आव्हानात्मक रस्त्यावरून स्पर्धक अतिशय वेगाने जाताना पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी विद्यार्थी, ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

हॉटेल विवेक येथे बक्षीस वितरण कार्यक्रमाला स्पर्धेचे आयकॉन सतीश जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष गणेश धुरी, जय हनुमान मित्रमंडळाचे अवधूत साळवी, लोहपुरुष, एसआर विनायक पावसकर, लोहपुरुष व एसआर यतीन धुरत, हायड्रेशन पार्टनर मॅनेकी कंपनीच्या संचालिका प्रीती गुप्ता, हॉटेल विवेकचे स्वयम देसाई आणि लायन्सचे अमेय वीरकर, प्रमोद खेडेकर उपस्थित होते.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी, जय हनुमान मित्रमंडळ व सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या सदस्य, स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वी केली. स्पर्धेत किमती सायकली पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळाली. या स्पर्धेसाठी भाट्ये, कसोप, फणसोप, वायंगणी, गोळप, पावस, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी आदी ग्रामपंचायतींचे सहकार्य लाभले.

कोकण कनेक्टिव्हिटी मुव्हमेंट सुरू

या स्पर्धेमुळे कोकण कनेक्टिव्हिटी मुव्हमेंट सुरू झाली. येत्या ५ जानेवारीला रत्नागिरी कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनचे दुसरे पर्व आणि २३ मार्च रोजी अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. रत्नागिरीमध्ये पर्यटनवाढीसाठी या स्पर्धा महत्त्वाच्या ठरत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande