- इराणकडून नो फ्लाय झोन घोषित
दमास्क, २६ ऑक्टोबर (हिं.स.):
इस्रायलने शनिवारी सकाळी इराणच्या लष्करी तळांवर हवाई हल्ला करून १ ऑक्टोबरला इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रतिउत्तर दिले. त्या हल्ल्यात इस्रायलवर सुमारे २०० क्षेपणास्त्र डागली गेली होती. स्वसंरक्षणाचा हक्क असल्याचे सांगत इस्रायलने आपले उद्दिष्ट साध्य केल्याचे जाहीर केले आहे.
या घटनेनंतर इराणने आपली हवाई हद्द बंद करत नो फ्लाय झोन घोषित केला आहे. इराकनेही आपली हवाई उड्डाणे थांबवली आहेत. या हल्ल्यामुळे युद्धाचे संकट निर्माण झाले असून इराण आणि इस्रायल यांच्यात तणाव अधिकच वाढला आहे. या हल्ल्याच्या काही वेळ आधीच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन शांततेसाठी इस्रायलमध्ये दाखल झाले होते. अमेरिकेने या हल्ल्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
इस्रायलने याचवेळी सिरियावरही हवाई हल्ला केला. त्याचे आवाज दमास्कसमध्ये ऐकू आले. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार हा हल्ला हिजबुल्लाहच्या तळांवर केला. इराणसमर्थित हिजबुल्लाह आणि हमास यांच्याशी इस्रायलचा संघर्ष सुरू असल्याने मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढला आहे.
दरम्यान, इराण-इराकच्या एका गटाने इस्रायलवरील ड्रोन हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इराणने इस्रायलला 'चोख प्रत्युत्तर' देण्याची तयारी दर्शवली आहे. १ ऑक्टोबरला इराणने इस्रायलच्या लक्ष्यांवर सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागली. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष आणखी वाढला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणने गंभीर चूक केल्याचे सांगून सूड घेण्याची ग्वाही दिली.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao