रायगड, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने रायगड जिल्ह्यातील रायगड किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली. या पथकाने कुशावर्त तलाव, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर, बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज समाधी, हत्तीखाना, भवानी मंदिर आणि टोक, टकमक टोक, यांमहत्त्वपूर्ण ठिकाणासह विविध ऐतिहासिक खुणांना भेट दिली. या पथकाने किल्ल्याचा इतिहास आणि सद्यस्थितीबद्दल उपस्थित अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या पथकामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ञ हेवान्ग ली, सह संचालक जागतिक वारसा (ए एस आय)मदन सिंग चौहान,महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग संचालक सुजित उगले, उपसंचालक हेमंत दळवी, डॉ. शुभा मजुमदार यांचा समावेश होता.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या सोबत झालेल्या चर्चे दरम्यान त्यांनी किल्ल्यातील हवामान, वनस्पती आणि इतर संबंधित पर्यावरणीय घटकांवर चर्चा केली. तसेच या किल्ल्याच्या संवर्धनासाठी रायगड जिल्हाप्रशासनाने घेतलेले निर्णय, सुरु असलेली कार्यवाही तसेच पर्यटन विकासासाठी केलेल्या उपाययोजना याबाबत माहिती घेतली.युनेस्कोने नामांकनाच्या संदर्भात हाती घेतलेल्या उपक्रमांबद्दल जावळे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच गडाच्या जतनामध्ये एकूणच प्रशासन, स्थानिक नागरिकांचा असलेला सहभाग याविषयी माहिती दिली.युनेस्को टीमने देखील देखभाल आणि संवर्धनासाठी संभाव्य सुधारणांबद्दल त्यांची मते मांडली. भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने स्थानिक प्रतिनिधी आणि गावकऱ्यांशी देखील संवाद साधला.यावेळी प्रांत डॉ. ज्ञानोबा बाणापुरे, प्राधिकरणच्या सलोनी साळुंखे, युनेस्को सदस्य, जिल्हाधिकारी, प्रांत बाणापुरे,प्राधिकरणाच्या सदस्य सलोनी साळुंखे,शिखा जैन, पुरातत्व विभाग शेख, रायगड पुरातत्व विभाग दिवेकर, वरूण भामरे तहसीलदार महेश शितोळे, रोप वे प्रतिनिधी राजेंद्र जोग, माजी सरपंच पाचाड राजेंद्र खातू,उपसरपंच संदीप ढवळे, गाव कमिटी सदस्य हिरकणीवाडी मनोहर अवकीवकर आदीनी चर्चेत सहभाग घेतला.
यावेळी रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेल्या नवोदय विद्यालय निजामपूरच्या विद्यार्थ्यांशी देखील या पथकाने संवाद साधला.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने