ठाणे, 4 ऑक्टोबर (हिं.स.)।ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वालावलकर मैदान, बोरीवडे या प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी घेतला.
बैठकीच्या सुरुवातीस उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांना नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.
तद्नंतर अधिकाऱ्यांना सूचना देताना पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या जिल्ह्यात हा कार्यक्रम होत आहे. शिस्तबद्धतेने सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी करूया. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रत्येक महिला भगिनीची व्यवस्थित काळजी घ्यावी. आपल्या घरातील महिलेला जशी वागणूक दिली जाते तशी सौहार्दाची वागणूक प्रत्येक महिला भगिनींना द्यावी.
मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे,अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, , पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाठ, मुख्यमंत्री कार्यालयाचे विकास औटे यांच्यासह विविध विभागांचे /कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत मुख्य सभामंडप, हेलिपॅड, गाड्या आणि बसेस पार्किंग व्यवस्था, स्वच्छ्ता, वीज पुरवठा, सीसीटीव्ही नेटवर्क, जोड रस्ते यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळाची पाहणीही केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर