रत्नागिरी : दापोलीतील विधी सेवा महाशिबिराचा १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ
रत्नागिरी, 5 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली येथील विधी सेवा महाशिबिरात शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते आज झाले. शिबिरात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विव
विधी सेवा प्राधिकरण महाशिबिरात लाभार्थ्यांना मदत वाटप


रत्नागिरी, 5 ऑक्टोबर, (हिं. स.) : दापोली येथील विधी सेवा महाशिबिरात शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते आज झाले. शिबिरात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिल्याची पुस्तिका जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी न्यायमूर्ती श्री. जामदार यांना सुपूर्द केली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैया सभागृहात हे विधी सेवा महाशिबिर पार पडले. उद्घाटनानंतर न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली आणि समाधान व्यक्त केले. यानंतर झालेल्या प्रमुख कार्यक्रमात ते म्हणाले, न्याय व्यवस्था आणि प्रशासन यांनी प्रगती केलेल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हे पद मिळाले. हा जिल्हा विचारवंतांचा, बुद्धिवंतांचा, त्याग करणाऱ्यांचा आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे, ही न्यायाची व्यापक संकल्पना आहे. भारतीय राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते सर्वच नागरिकांना मिळाले पाहिजेत. सामाजिक न्याय तत्त्वांचा अंगीकार केलेला आहे. संविधानात अपेक्षित असणारा न्याय राजनैतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समान संधी मिळण्याचा असा सर्वसमावेशक आहे. नागरिकांना जगण्याचा अधिकार आहेच, पण घटनेने तो अधोरेखित केलेला आहे. जीवन प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आहे. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत नागरिकाला लाभ पोहोचवायचा असेल, तर कल्याणकारी योजना आखणे आणि त्याची अंमलबजावणी करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठीच विधी सेवा महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या कार्यक्रमाला लाभार्थ्यांचा मिळालेला प्रतिसाद, त्यांना देण्यात आलेला लाभ हे पाहून समाधान आणि आनंद वाटतो. इतक्या मोठ्या संख्येने जिल्हा प्रशासनाने जनतेला लाभ दिल्याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन शहरात दीडशे, तर जिल्ह्यात ३५० कार्यक्रम घेतले. जनजागृती करणे, नागरिकांना विविध विषयातील हक्क, गुन्ह्यांबाबत शिक्षेची माहिती देणे, न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या कमी करणे हा या कार्यक्रमामागील हेतू होता. लाभार्थ्यांनी, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, या महाशिबिराची युद्धपातळीवर तयारी केली. विविध ४४ विभागांमार्फत ३१ स्टॉल उभारून १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना लाभ दिला जातोय. यापुढेही लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. ४ लाख १३ हजार महिलांना लाभ देत आहोत. शासन आपल्या दारी हा उद्देश प्रशासनामार्फत पूर्ण करतोय. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवर्जून आवाहन त्यांनी केले. यावेळी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश निखिल गोसावी यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील विजयसिंह पवार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तालुका वकील संघाचे अध्यक्ष वकील श्री. पवार यांनी आभार प्रदर्शन केले. वकील सचिन गद्रे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सुरुवात वडाच्या झाडाला पाणी घालून तर सांगता राष्ट्रगीतांनी झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर


 rajesh pande