रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : देवरूखची ग्रामदेवता श्री सोळजाई देवीचा शुभाशीर्वाद घेऊन चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांच्या देवरूख शहरातील प्रचाराला दणक्यात प्रारंभ झाला.
प्रचाराला प्रारंभ झाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारे उत्साह संचारला आहे. चिपळूण मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव उमेदवार आहेत. त्यांच्या देवरूखमधील प्रचाराला प्रारंभ झाला. यावेळी प्रशांत यादव यांच्या विजयासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोळजाई देवीला गाऱ्हाणे घातले.
यावेळी महाविकास आघाडीचा विजय असो, प्रशांत यादव तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है आदी घोषणा देण्यात आल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन वनकर, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, देवरूख शहराध्यक्ष निलेश भुवड, बाबा सावंत, अल्ताफ जेठी, शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्या वेदा फडके, माजी नगराध्यक्षा नीलम हेगशेट्ये, माजी उपसभापती छोट्या गवाणकर, इस्त्याक कापडी, दर्शन भाटकर आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर