रत्नागिरी, 13 नोव्हेंबर, (हिं. स.) : मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्या चारचाकी वाहनाची तपासणी स्थिर सर्वेक्षण पथकाने केली असता ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने विनापावती मिळून आले. ते तूर्त जप्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
इको हे वाहन मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या एसएसटी पथकाने हातखंबा तपासणी नाक्यावर तपासणी करताना, या इको वाहनात ३४ लाख ८५ हजार ९४७ रुपयांचे सोने आढळले. याबाबत कोणतीही कागदपत्रे सोबत नसल्याने ते एसएसटी पथकाकडून ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व एसएसटी आणि एफएसटी पथकांना विविध तपासणी नाक्यांवर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पाचही विधानसभा मतदारसंघात एसएसटी, एफएसटी पथकांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर