सिंधुदुर्ग - विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय सिंधू आयटी जीनियस स्पर्धेचे आयोजन
एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमीचा पुढाकार लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल अशी ३० लाखाची बक्षिसे सिंधुदुर्ग, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। शिकता शिकता ज्ञान मिळवा आणि बक्षीस कमवा अशी संकल्पना घेऊन एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या
पत्रकार परिषदेत माहिती देताना एमकेसीएलच्या जिल्हा समन्वयक प्रणय तेली. बाजूला सिंधू संकल्प अकादमीचे


एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमीचा पुढाकार

लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल अशी ३० लाखाची बक्षिसे

सिंधुदुर्ग, 29 नोव्हेंबर (हिं.स.)। शिकता शिकता ज्ञान मिळवा आणि बक्षीस कमवा अशी संकल्पना घेऊन एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधू आयटी जीनियस स्पर्धा आयोजित केली आहे. महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित यांच्या एमएस-सीआयटी या शासनमान्य कंप्युटर कोर्सच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा असून गुणवता यादीतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर फायनल परीक्षा घेतली जाईल. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सिंधू आयटी जीनियस जूनियर आणि अकरावी ते पंधरावीच्या विद्यार्थ्यांकरता सिंधू आयटी जीनियस सीनियर अशा स्तरांमध्ये ही स्पर्धा होईल. या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर लॅपटॉप, टॅबलेट आणि मोबाईल अशी एकूण ३० लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. २०२५ मध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात हि स्पर्धा होईल अशी माहिती, एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांनी दिली. कुडाळ येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सिंधू संकल्प अकादमीचे देवेंद्र गावडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रणय तेली यांनी सांगितले कि, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आयटी मधील स्किल समजावीत आणि आयटी मधील त्यांचा आत्मविश्वास वाढवा याकरिता ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. शिकता शिकता ज्ञान मिळवा आणि बक्षीस कमवा अशी ह्या स्पर्धेची संकल्पना असून शालेय विद्यार्थ्यांपासून ते कोलेज विद्यार्थ्यांपर्यंत सर्व विद्यार्थी कंप्यूटर शिकता शिकता ही स्पर्धा देऊ शकतील.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरावर लॅपटॉप, टेबलेट आणि मोबाईल अशी बक्षिसे असून तालुकास्तरावर सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शालेय स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल्स देऊन सन्मानित केले जाईल आणि एमकेसीएलच्या स्थानिक अधिकृत अध्ययन केंद्राच्या स्तरावर रु. १२५००, रु.५००० आणि रु.२५०० अशा क्लिक वाउचर दोन्ही गटांना प्रोत्साहन पर दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला फर्स्ट लेसन इन आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात FLAI फ्लाय हा कोर्स मोफत दिला जाणार आहे.

कंप्यूटर आणि स्मार्टफोनची स्किल्स, स्मार्ट टायपिंग स्किल्स, डेली लाईफ स्किल्स, ऑफिस प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स, डिजिटल इंडिया स्किल्स, जॉब रेडीनेस स्किल्स, स्टडी स्किल्स, कोडींग स्किल्स, सोशल मीडिया स्किल्स, सायबर सिक्युरिटी स्किल्स, नेटिकेट्स आणि कम्प्युटर इर्गोनोमिक्स त्याचप्रमाणे विंडोज 10, एम एस ऑफिस, इंटरनेट गुगल वर्क प्लेस, मशीन लर्निंग, बिग डेटा, ऑगमेंटेड रियालिटी, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, 3d प्रिंटिंग, आर्टिफिशिअल इन्जेलीजेंस ह्या एमएस-सीआयटीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही स्पर्धा असेल.

ही स्पर्धा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल पहिल्यांदा ऑनलाईन बहुपर्यायी उत्तरे अर्थात MCQ आणि दुसऱ्या टप्प्यात पात्र विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाईल. दोन्ही परीक्षा मधील गुणांची एकत्रीत बेरीज करून 40 विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. आणि जिल्हास्तरावर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी काठीण्य पातळी असलेली ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल आणि त्यातून विजेते निवडले जातील. समान गुण असल्यास लकी ड्रॉ द्वारे विजेते निवडले जातील. या स्पर्धे करता विद्यार्थ्याने एम एस सी आय टी चा अभ्यासक्रम अभ्यासणे आवश्यक आहे आणि मॉक टेस्टची प्रॅक्टिस, टाईम मॅनेजमेंट इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. भविष्यातील विविध संधीकरिता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध नवीन विषयांचा अभ्यास करणे त्याचप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाशी आपण जोडले जाणे आणि अर्थात आपल्या ज्ञानाच्या जोरावर बक्षीस मिळवायचा प्रयन करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

१५ डिसेंबर २०२४ पर्यंत आपल्या नजीकच्या महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अर्थात एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये आपण या परीक्षेकरिता अर्ज करू शकतात. या परीक्षेची फी १०० रुपये असून प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला FLAi - फ्लाय अर्थात फर्स्ट लेसन इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स संबंधित अधिकृत अध्ययन केंद्रात मोफत दिला जाणार आहे.

या स्पर्धेतील पहिली परीक्षा १५ जानेवारी ते २० जानेवारी २०२५ दरम्यान संबंधित अधिकृत अध्ययन केंद्रात होईल आणि प्रेक्टिकल परीक्षा २५ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत होईल. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय ऑनलाईन परीक्षा कुडाळ येथे होईल. आणि दहावीची परीक्षा संपल्यानंतर मार्च अखेरीस या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जिल्हास्तरावर घेण्यात येईल.

या स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन एमकेसीएल सिंधुदुर्ग आणि सिंधू संकल्प अकादमी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी


 rajesh pande