अहमदनगर, 6 नोव्हेंबर (हिं.स.):- फटाका विक्रीच्या व्यवसायाची जाहिरात करणाऱ्या रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी जाब विचारल्याच्या कारणातून जातीवाचक शिवीगाळ करुन अंगावर थुंकून लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार चालक प्रशांत सोन्याबापू रोमन (राहाणार नागापूर) यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यान्वये अंतोन शामसुंदर गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंतोन गायकवाड यांनी नागापूर येथे फटाके विक्रीचा स्टॉल लावला आहे.त्याच्या जाहिरातीसाठी रिक्षा लावली होती.
सदर रिक्षाला प्रशांत रोमन या कार चालकाने धडक दिली.हा प्रकार रिक्षा चालकाने गायकवाड यांना सांगितला असता त्यांनी आपल्या मेहुणीसह येऊन नगर-मनमाड रस्त्यावर सदर कार चालकास जाब विचारला.त्यावेळी रोमन यांनी जातिवाचक शिवीगाळ करून अंगावर थुंकला व कारमधून उतरून लाकडी दांडक्याने उजव्या हाताच्या बोटावर फटका मारुन दुखापत केली.मेहुणी अश्विनी आल्हाट हिला ढकलून दिल्याची फिर्याद अंतोन गायकवाड यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिली.त्यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत रोमन यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये व भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni