सिंधुदुर्ग, 17 जानेवारी (हिं.स.)। सख्ख्या भावाच्या डोक्यावर फुंकणीने हल्ला करून त्याच्या खून केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश तुकाराम गिरी गोसावी (६०, रा- कुरंगवणे ता, कणकवली) याला ७ वर्षाचा सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे. ही घटना २१ एप्रिल २०२२ ला घडली. या प्रकरणी प्रकाश तुकाराम गिरी गोसावी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैयक्तिक कारणाच्या रागातून हा प्रकार घडला होता. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
प्रकाश आणि संतोष हे दोन सख्खे भाऊ कुरंगवणे, कणकवली येथे निवासी राहत होते. दरम्यान मयत संतोष हे २१ एप्रिल २०२२ रोजी रात्री ८:३० वा. सुमारास आपल्या भावाच्या घरी गेले होते. यावेळी प्रकाश यांच्या मुलीने तयार करून ठेवलेले जेवण संतोष याने संपवले होते. याचा राग मनात ठेवून प्रकाश याने लोखंडी फुंकणीने संतोष यांच्या डोकीवर प्रहार केला होता. यात संतोष यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी प्रकाश यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात झालेल्या सुनावणीत प्रत्यक्षदर्शी महिला साक्षीदार, वैद्यकीय अहवाल आणि सरकारी वकिलांना युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने प्रकाश यांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवत ७ वर्षे सश्रम कारावास आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / निलेश जोशी