भविष्यात खाटा उपलब्धतेनुसार शस्त्रक्रिया आयोजित करू - डॉ. नितीन तडस
हिंगोली, 14 डिसेंबर (हिं.स.)। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे ३० घाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. येथील रुग्णालयात प्रसूती सुविधांसह इतरही बाबींचा विचार करून भविष्यात पुरेशा खाटा उपलब्धतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे जिल्हा शल्य चिकि
भविष्यात खाटा उपलब्धतेनुसार शस्त्रक्रिया आयोजित करू - डॉ. नितीन तडस


हिंगोली, 14 डिसेंबर (हिं.स.)। कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे ३० घाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजूर आहे. येथील रुग्णालयात प्रसूती सुविधांसह इतरही बाबींचा विचार करून भविष्यात पुरेशा खाटा उपलब्धतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी आज सांगितले.

आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिका-यांना तशा सूचना दिल्या.

आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसह तांबी बसविणे, मोफत रुग्णवाहिका सेवा, गरोदर माता प्रसूतीपूर्व तपासणी सुविधा, आहार सेवा, प्रयोगशाळा सुविधा, बाह्यरुग्ण विभाग, हिरकणी कक्ष, औषधी वितरण सुविधा, अपघात विभाग, कुटूंब कल्याण शस्त्रकिया टाका व बिनटाका, आयुष्यमान भवः उपक्रम, सिकलसेल तपासणी, कोवीड-१९ तपासणी, आयुष्यमान भवः कार्ड वाटप, निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे उपक्रम, कायाकल्प उपक्रम, लसीकरण आधी उपक्रम आदि सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ डिसेंबर, २०२४ रोजी बिनटाका नसबंदीचे मोठे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि. १२ डिसेंबर, २०२४ रोजी आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतील ग्रामीण भागातील गावातून ४२ रुग्ण भरती झाले होते.

या सर्व रुग्णांची शस्त्रक्रिया पूर्व तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव व भूलतज्ज्ञ डॉ. सुर्या घुमाडे यांच्या चमूने इत्यंभूत तपासणी केली. या तपासणीत सर्व ४२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र झाले होते.

त्याअनुषंगाने दि. १३ डिसेंबर, २०२४ रोजी डॉ. रमेश बोले व डॉ. सुर्या घुमाडे यांनी सकाळी ८.३० वाजेपासून बिनटाका शस्त्रक्रिया सुरु केली होती. त्यांनी कोणतीही गुंतागुंत न होता यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडल्या. त्यामुळे सर्व रुग्णांना आज शनिवार (दि.१४) रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन जाधव व भूलतज्ज्ञ डॉ. सुर्या घुमाडे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या शिबिरामध्ये रुग्ण भरती करणे, शस्त्रक्रिया करणे, रुग्णांची सुट्टी देणे इत्यादी सर्व कामे नियमानुसार व काटेकारपणे पार पाडण्यात आले. या शिबिराबाबत रुग्ण व नातेवाईक संतुष्ट होते. त्यातील काही रुग्णांनी उत्कृष्ट नियोजन म्हणून लेखी अभिप्राय दिला असल्याचे डॉ. तडस यांनी सांगितले.

रुग्णालयाची क्षमता ३० खाटांची असून नसबंदीचा चौथा दिवस असल्याकारणाने अधिचे भरती झालेले १० रूग्ण रुग्णालयात होते. तसेच इतर ९ असे एकूण १९ रुग्ण विविध कक्षात भरती होते. उर्वरित खाटा प्रसूती व अपघात रुग्णांना शिल्लक होत्या. त्यामुळे प्रत्येक रुग्णांना स्वतंत्र गादी ब्लॅंकेटची सोय करण्यात आली होती. कोणत्याही रुग्णाला जमिनीवर झोपण्यात आले नव्हते.

त्यामुळे प्रसारीत होणारी बातमी परिस्थितीशी विसंगत असून, याबाबत काही तथ्य नाही. आ. संतोष बांगर यांनी ग्रामीण रुग्णालय आखाडा बाळापूरला भेट देऊन रुग्णांना दिलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तरी सुद्धा या परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्हा रुग्णालय हिंगाली येथून अतिरिक्त २० खाटा पुरवण्यात आल्या आहेत व यापुढील शिबिरास सर्व रुग्णांना पुरेशा प्रमाणात खाटा उपलब्ध देण्याची व्यवस्था करुनच शिबीर आयोजित करण्यात यावेत, अशी ताकीद वैद्यकीय अधीक्षकांस देण्यात आली असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांनी कळविले आहे .

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande