भाजपकडून काँग्रेसची मुस्लिमलीगशी तुलना
बेंगळुरू, 26 डिसेंबर (हिं.स.) : काँग्रेसच्या बेलगावी अधिवेशनातील पोस्टरवर असलेल्या भारताच्या नकाशावरून देशभरात राजकारण तापले आहे. पोस्टरमध्ये काश्मीरला पाकिस्तानचा भाग दाखवण्यात आले आहे. यावरून भाजपने काँग्रेसवर घणाघाती टीका करत त्यांची तुलना मुस्लीम लीगशी केली आहे.
यासंदर्भात भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, काश्मीरला पाकिस्तानचा भाग म्हणून दाखवण्यात आले आहे. काँग्रेसच्या कार्यक्रमात ही चूक असू शकत नाही. हा त्यांच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचा भाग आहे. काँग्रेसला असे वाटते की, भारतीय मुस्लिम भारतापेक्षा पाकिस्तानशी अधिक निष्ठावान आहेत. काँग्रेस ही दुसरी मुस्लिम लीग असून त्यांना पुन्हा भारत तोडायचा आहे, असा आरोप अमित मालवीय यांनी केला. कर्नाटकच्या बेळगावी अधिवेशनाच्या बॅनरमध्ये छापलेल्या भारताच्या नकाशातून पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चिनचा भाग गायब झाला आहे. महात्मा गांधी यांनी 1924 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्याच्या शतकपूर्तीनिमित्त काँग्रेस पक्षाने कर्नाटकातील बेळगावी येथे सीडब्ल्यूसीची विशेष बैठक आयोजित केली आहे. महात्मा गांधींनी 100 वर्षांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीचे अध्यक्षपद बेळगावमध्येच भूषवले होते. या आयोजनावरून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी टीकास्त्र सोडले आहे. बोम्मई म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस आणि आजची काँग्रेस या दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातली काँग्रेस ही राष्ट्रवादी होती. तर वर्तमानातील काँग्रेस ही जनताविरोधी, देशविरोधी आहे. या लोकांना उत्सव साजरा करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, पण ते उत्सव साजरा करत असल्याचा टोला बोम्मई यांनी लगावला.
--------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी