मेलबर्न, २८ डिसेंबर (हिं.स.) : भारतीय संघाचा नवखा क्रिकेटपटू नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलिया विरूद्ध धमाकेदार अर्धशतक ठोकलं आहे. हे अर्धशतक ठोकल्यानंतर नितीशने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले आहे. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे. नितीशकुमार रेड्डीने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्यानंतर चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. यातून त्याने निवड समितीचा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले.
मेलबर्नच्या खेळपट्टीवर सुरू असलेल्या सामन्यात जिथे रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जडेजासारखे दिग्गज खेळाडू धावा काढण्यासाठी धडपडताना दिसले, तिथे 21 वर्षीय युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वालने 118 चेंडूत 82 धावांची खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली, तर पंत बाद झाल्यानंतर नितीश कुमार रेड्डीने संघाचा डाव सांभाळला.
भारतासाठी पहिल्या डावात खेळताना नितीशने 80 चेंडूंचा सामना करत 50 धावा पूर्ण केल्या. यात त्याने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. हे त्याचे पहिले कसोटी अर्धशतक होते. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी दरम्यान नितीशने भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 4 कसोटी सामने खेळताना 222 धावा केल्या आहेत.
मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या डावाच्या 74व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नितीश जखमी झाला होता. पॅट कमिन्सचा शॉर्ट बॉल त्याच्या खांद्याला लागला. यावेळी त्याला खूप वेदना होत होत्या. त्याला इतक्या जोरात बॉल लागला की त्याच्या हातातून बॅटही खाली पडली. फिजिओ टीम लगेच मैदानात आली आणि त्यानंतर त्यांनी बॅटिंग सुरूच ठेवली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी