लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यासाठी २१ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावल्या
- राज्यातील पाच मतदारसंघांपैकी नागपूर, चंद्रपूरकडे विशेष लक्ष नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.) - लोकस
LS Elections 


- राज्यातील पाच मतदारसंघांपैकी नागपूर, चंद्रपूरकडे विशेष लक्ष

नवी दिल्ली, 17 एप्रिल (हिं.स.) - लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी देशभरात एकूण २१ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रामटेक आणि भंडारा-गोंदिया या पाच लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी (१९ एप्रिल) मतदान होत आहे. या पाच मतदारसंघांसह देशभरातील १०२ मतदारसंघातील शिगेला पोचलेला प्रचार बुधवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. आता उर्वरीत ४८ तासांत जाहीर वगळता छुपा म्हणजे वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. दरम्यान भंडारा-गोंदिया लोकसभेतील अर्जुनी मोरगाव विधानसभा आणि गडचिरोली-चिमूर लोकसभेतील देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात दुपारी तीन वाजता, तर गोंदिया आणि तिरोडा या दोन विधानसभा क्षेत्रामध्ये सायंकाळी सहा वाजता प्रचारतोफा थंडावल्या.

अशा असतील विदर्भातील प्रमुख लढती

नागपूर - नितीन गडकरी (भाजप) विरुद्ध विकास ठाकरे (काँग्रेस)

चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार (भाजप) विरुद्ध प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)

रामटेक - राजू पारवे (शिंदे गट) विरुद्ध श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)

भंडारा गोंदिया - सुनील मेंढे (भाजप) विरुद्ध प्रशांत पडोळे (काँग्रेस)

गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) विरुद्ध नामदेव किरसान (काँग्रेस)

देशातील अन्य प्रमुख लढती

यासोबतच पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये तेलंगणाचे माजी राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन (चेन्नई दक्षिण, तामिळनाडू), डीएमके नेते दयानिधी मारन (चेन्नई मध्य, तामिळनाडू), माजी केंद्रीय मंत्री ए. राजा (निलगिरी, तामिळनाडू) आणि तामिळनाडू भाजपचे प्रमुख के अन्नामलाई (कोयंबतूर), जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात उधमपूरमधून केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह निवडणूक रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आसामच्या दिब्रुगड, तर काँग्रेस नेते गौरव गोगोई जोरहाटमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानच्या बिकानेर लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गोविंद राम मेघवाल मैदानात उतरले आहेत. गोविंद मेघवाल हे राज्यातील अशोक गेहलोत सरकारमध्ये मंत्री होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande