रत्नागिरी : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२० मध्ये भेटते - अरविंद गोखले
रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२०मध्ये भेटते. म्हणून त्यांच
रत्नागिरी : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२० मध्ये भेटते - अरविंद गोखले


रत्नागिरी, 25 एप्रिल, (हिं. स.) : लोकमान्यांचे सर्वमान्य नेतृत्व १९१४-१९२०मध्ये भेटते. म्हणून त्यांच्याविषयीच्या ग्रंथाला ‘टिळकपर्व’ नाव दिले, असे प्रतिपादन ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणारे ज्येष्ठ पत्रकार-लेखक अरविंद गोखले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर समारंभाचे अध्यक्ष सातारा येथील दै. ऐक्यचे माजी संपादक वासुदेव कुलकर्णी, विशेष निमंत्रित चिपळूण पालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले, वाचनालयाचे उपाध्यक्ष सुनील खेडेकर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे होते.

तब्बल ३६ वर्षांची संपादकीय कारकीर्द भूषविणाऱ्या गोखले यांनी लिहिलेल्या 'टिळक पर्व' (१९१४-१९२०) या चरित्रग्रंथाला चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ‘लोकमान्य विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, लोकमान्यांच्या जीवनावरील ‘टिळकपर्व’ या ग्रंथाला ’पर्व’ म्हणायचे की ‘युग’ म्हणायचे, असा शब्दांचा संघर्ष मनात सुरू होता. शेवटी महाभारतकाळामधील ‘पर्व’ शब्द पुढे आणला गेला. टिळकांचे नेतृत्व पहिल्यापासूनच जहाल होते. १९१४नंतर पहिले महायुद्ध उभे राहिले. नंतरच्या कालखंडात ब्रिटिश अडचणीत आले, त्यांची कोंडी झालेली होती. तेव्हा त्यांना पेचात आणायचे काम टिळकांकडून केले गेले. लेनिन आणि मजूरपक्ष आदींनी, ‘टिळकांचे नेतृत्व मोठे आहे’ हे मान्य केले होते. या पार्श्वभूमीवर विचार करताना हे नाव देण्याचे ठरविले.

रस्कार वितरण कार्यक्रमानंतर चितळे यांनी अरविंद गोखले यांची विस्तृत मुलाखत घेतली. यावेळी गोखले यांनी टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन उपस्थितांना घडवले. या वाचनालयात मी यापूर्वी येऊन गेलेलो आहे. वाचनालयाचे आजचे स्वरूप भारावून टाकणारे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेव कुलकर्णी हे आपले संदर्भ प्रमुख असा उल्लेख केला. कुलकर्णी यांच्या हस्ते मिळालेला हा विशेष पुरस्कार ही काजव्याची तेजाने केलेली आरती असल्याचे कृतज्ञ भावनिक उद्गार गोखले यांनी काढले. कुलकर्णी यांना कोणताही प्रश्न विचारल्यावर ‘पाहावं लागेल’ असे त्यांनी कधी म्हटलेले नाही, अशा शब्दांत त्यांचा गौरव केला. ‘मंडालेचा राजबंदी’ हे उत्स्फूर्त सुचलेले नाव होते. केसरीतील कालखंड आणि जयंतराव टिळक यांच्यासोबतच्या ऋणानुबंधातून टिळक विषयावरील आत्मीयता, प्रभाव आणि लेखन आकाराला आल्याचे त्यांनी सांगितले. मराठी वर्तमानपत्रांमध्ये जो संदर्भ साहित्याचा अभाव आपल्याला सापडतो, तो केसरीत नाही. तिथे मुबलक संग्रह उपलब्ध आहे. टिळकांच्या जीवनातील १९१४-१९२० हा सर्वांत जहाल कालखंड आहे. अमेरिकेतील ग्रंथालयात मिळालेल्या सहकार्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. केसरीच्या कार्यालयात ग्रंथालयात एक तांबडी खूण आहे. ती पानशेतच्या धरणाची तीव्रता दाखवते. त्याच्यावरच्या रकान्यात ‘गीतारहस्य’ची हस्तलिखित प्रत होती. ‘टिळक इंक्लाइन’ नावाचा भाग आजही पाकिस्तानातील सिंध हैदराबादला आहे. तेथे उर्दू-इंग्रजीत या नावाच्या पाट्या आहेत. असे गोखले यांनी नमूद केले.

संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात संत निवृत्तीनाथांचे जे स्थान आहे, तेच मोठ्या भावाचे स्थान माझ्या आयुष्यात गोखले यांचे असल्याचे वासुदेव कुलकर्णी यांनी म्हटले. कोणत्याही लेखनासाठी संशोधन, लेखन साधने मिळवण्यासाठीची चिकाटी, बैठक, जिद्द आणि शिस्त असावी लागते. ती गोखले यांच्याकडे आहे. लोकमान्यांच्या जन्मभूमीत, त्यांच्याच नावाच्या संस्थेकडून त्यांच्याविषयीच्याच कार्यासाठी दिला गेलेला विशेष पुरस्कार अमूल्य आहे. लोकमान्य हे किमान ६४ विषयांत पारंगत होते. त्यांना संपूर्ण भारताचा इतिहास १० खंडांत लिहायचा होता. मंडालेच्या तुरुंगात झालेल्या हालांमुळे टिळकांचा मृत्यू लवकर झाल्याचे निरीक्षण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नोंदवून ठेवल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय परिवारात वावरून ‘बहुश्रुत’ व्हायला मिळत असल्याचा आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने टिळकप्रेमी उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande