लोकसभा निवडणूक : दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यांत ८८ जागांसाठी शुक्रवारी मतदान
* विदर्भ, मराठवाड्यातील ८ मतदारसंघांचा समावेश मुंबई, २५ एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्य
दुसरा टप्पा 


दुसरा टप्पा 


* विदर्भ, मराठवाड्यातील ८ मतदारसंघांचा समावेश

मुंबई, २५ एप्रिल (हिं.स.) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात मराठवाडा ३, विदर्भ ५ यांसह देशभरातील १२ राज्यांत एकूण ८८ जागांसाठी उद्या, शुक्रवार मतदान पार पडणार आहे. यासाठी एकूण १२०६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघांसाठी बुधवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. याआधी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी देशातील १०२ जागांसाठी मतदान पार पडले होते.

उद्या होणार्या मतदानात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड, तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ-वाशीम, बुलढाणा, अकोला आणि वर्धा या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच छत्तीसगड ३, कर्नाटक १४, केरळ २०, आसाम ५, बिहार ५, मणिपूर १, राजस्थान १३, त्रिपुरा १, मध्य प्रदेश ६, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३ आणि जम्मू-काश्मीर १, या राज्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात अशा आहेत लढती

महाराष्ट्रातील आठही मतदारसंघांत अटीतटीची लढाई होणार आहे. नांदेड मतदारसंघात प्रत्यक्ष निवडणुकीत उभे नसले तरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तर अकोल्यातून निवडणूक लढवत असलेले वंचितचे प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेचे संजय देशमुख आणि शिंदे गटाच्या राजश्री पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. राजश्री पाटील यांना विद्यमान खासदार भावना गवळी यांचे तिकीट कापून उमेदवारी दिली आहे.

अशा होणार राज्यात लढत

याआधी नांदेडमध्ये चिखलीकर विरुद्ध चव्हाण असे चित्र होते, मात्र आता नांदेड लोकसभा मतदारसंघ अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आहे. येथून भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेसचे वसंत चव्हाण अशी थेट लढत होणार आहे.

हिंगोली मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर आणि शिंदे गटाचे बबनराव कदम पाटील कोहळीकर यांच्यात सामना होत आहे. हे दोन्ही उमेदवार पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

परभणी मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार खासदार संजय जाधव हे हॅट्ट्रिक करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून रासपचे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, कॉंग्रेसचे डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात आहेत. यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नरेंद्र खेडेकर यांचे तगडे आव्हान आहे.

वर्धा मतदारसंघात भाजपचे खासदार रामदास तडस विजयाची हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यापुढे राष्ट्रवादीचे अमर काळे यांनी आव्हान आहे.

अमरावतीत भाजपशी जवळीक साधलेल्या नवनीत राणा, कॉंग्रेसचे बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून उभे असलेले दिनेश बूब यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

'हे' आहेत देशभरातील दिग्गज

दरम्यान या टप्प्यात देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. यात राहुल गांधी, शशी थरूर, भूपेश बघेल, ओम बिर्ला, हेमा मालिनी, एचडी कुमारस्वामी, अरुण गोविल आणि प्रल्हाद जोशी आदी उमेदवार रिंगणात आहेत.

दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व २० लोकसभा जागांवर मतदान होणार आहे. या २० जागांपैकी एक जागा वायनाड आहे, जिथून काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी ४,३१,७७० मतांनी निवडणूक जिंकली होती.

माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल छत्तीसगडच्या राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत. तर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी कर्नाटकच्या मंड्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवर काँग्रेसचे व्यंकटरमण गौडा त्यांना आव्हान देणार आहेत.

केरळमधील तिरुअनंतपुरम ही जागा दुसऱ्या टप्प्यातील सर्वात हायप्रोफाईल जागांपैकी एक आहे. येथे एका बाजूला भाजपकडून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर निवडणूक रिंगणात आहेत तर दुसरीकडे काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर लढत आहेत. अभिनेत्री हेमा मालिनी उत्तर प्रदेशच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर 'रामायण' मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल उत्तर प्रदेशातील मेरठ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande