काँग्रेसला कर्नाटकचे मॉडेल संपूर्ण देशात लागू करायचेय - पंतप्रधान
भोपाळ, 25 एप्रिल (हिं.स.) - काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीसाठी अस्वस्थ झाली आहे. देशातील कोट्
PM Modi 


भोपाळ, 25 एप्रिल (हिं.स.) - काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीसाठी अस्वस्थ झाली आहे. देशातील कोट्यवधी नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक करून आणि सत्ता बळकावून जनतेचे भवितव्य उद्ध्वस्त करण्यावर काँग्रेस भर देत आहे. काँग्रेस पुन्हा धार्मिक तुष्टीकरणाला प्याद बनवत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मावर आधारित आरक्षण पूर्णपणे नाकारले होते पण काँग्रेसने फसवणूक करून कर्नाटकात एका विशिष्ट वर्गाला आरक्षण दिले. व्होट बँक आणि तुष्टीकरणात बुडालेल्या काँग्रेसला कर्नाटकचे हे मॉडेल संपूर्ण देशात लागू करायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

मध्य प्रदेशातील मुरैना येथे गुरुवारी आयोजित केलेल्या विशाल विजय संकल्प सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी केंद्रीय मंत्री आणि गुनाचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष व खजुराहोचे उमेदवार विष्णू दत्त शर्मा, मुरैनाचे उमेदवार शिव मंगल सिंग तोमर, भिंडच्या उमेदवार संध्या राय आणि ग्वाल्हेरचे उमेदवार भरत सिंह मंचावर उपस्थित होते.

मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या वेळी काँग्रेसने भारत मातेच्या हातातील बेड्या तोडण्याऐवजी धर्माच्या नावावर देशाची फाळणी केली होती. काँग्रेसने भारत मातेच्या साखळ्या तोडण्याऐवजी देशाचे तुकडे केले. हा आपल्या फायद्याचा मार्ग असल्याचे काँग्रेसला वाटत असून आज पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेच्या खुर्चीसाठी अस्वस्थ झाली आहे. खुर्ची मिळविण्यासाठी काँग्रेस विविध खेळ खेळत आहे.

धार्मिक आधारावर आरक्षण देण्याचा काँग्रेसचा राजकीय डाव असल्याचे म्हणत पंतप्रधान म्हणाले की, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे हक्क हिरावून घेण्याचे षड्यंत्र काँग्रेस अनेक वर्षांपासून करत आहे. १९ डिसेंबर २०११ रोजी काँग्रेसने केंद्र सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणातील काही भाग वजा करून विशिष्ट धर्माला धार्मिक आधारावर कोटा देण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. यानंतर २२ डिसेंबर २०११ रोजी त्याचा आदेशही देण्यात आला होता पण नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने काँग्रेस सरकारचा हा आदेश रद्द केला. यानंतर काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात गेली पण तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. यानंतर काँग्रेसने २०१४ च्या जाहीरनाम्यात धार्मिक आरक्षणासाठी कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. पण २०१४ मध्ये दलित, ओबीसी आणि आदिवासी समाजाने एकजुटीने विरोध केला आणि काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले. मात्र काँग्रेस पुन्हा आपले अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी नवनवीन खेळी करत आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास मध्य प्रदेशातील कुशवाहा, यादव, गुज्जर, गडरिया आणि धाकड प्रजापती समाजाचे आरक्षण हिसकावून आपल्या आवडत्या व्होटबँकेला देण्याचा डाव आखला जात आहे. पण जनता काँग्रेसचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही आणि काँग्रेसला पूर्णपणे संपुष्टात आणेल.

देशासमोर एक आश्चर्यकारक वस्तुस्थिती मांडताना मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर त्यांच्या वारशाचा काही भाग त्यांच्या मुलांना मिळण्याआधीच सरकारने हिसकावून घेतला कारण काँग्रेसने यापूर्वीही असा कायदा केला होता. पण त्यांची मालमत्ता वाचवण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वारसा कर कायदा रद्द करून इंदिरा गांधींची संपूर्ण मालमत्ता कर न भरता त्यांच्या नावावर केली. जेव्हा स्वत:वर आले तेव्हा कायदा रद्द केला आणि आता पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस तोच कायदा आणखी प्रभावीपणाने आणण्याची भाषा करत आहे. चार पिढ्यांपासून आपल्या कुटुंबाची अफाट संपत्ती करविना वारसाहक्काने मिळवल्यानंतर आता या काँग्रेस नेत्याला वारसाहक्क कर लावून देशातील अर्धी संपत्ती लुटायची आहे. त्यामुळेच आज देश म्हणतोय की काँग्रेस हयातीत आणि हयातीनंतरही लुटतेय. काँग्रेस आणि देशातील जनता यांच्या या घातक हेतूंमध्ये मोदी भिंत बनून उभे आहेत. मोदी ५६ इंच उंच छाती घेऊन उभे असल्याने हे अपशब्द बोलले जात आहेत. काँग्रेसचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत ही मोदींची हमी आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande