जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व बैठकीचे उद्या वाशी येथे आयोजन
नवी मुंबई, 30 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा दिलेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रातील शालेय
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व बैठकीचे उद्या वाशी येथे आयोजन


नवी मुंबई, 30 जुलै, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा दिलेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्य क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना सन 2008 पासून स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झाल्याने क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने स्वतंत्र जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धा आयोजनासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध स्पोर्टस् असोसिएशन, जिमखाना, खाजगी शाळा व संस्था वेळोवेळी सक्रीय सहभागी होत सहकार्य करत आलेले आहेत.

केंद्र शासनाच्या स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांचेकडून सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्या अनुषगांने आयुक्त, क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांची बैठक घेऊन राज्यस्तरीय स्पर्धा आयोजन वाटपित केलेले आहेत.

त्यानुसार विभागीय उप संचालक, मुंबई विभाग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांचे सहकार्याने, नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षामधील जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्पर्धांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शासन मान्यताप्राप्त महापालिका व खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सहभागी होऊ शकतील. याकरिता स्पर्धा पूर्व बैठकीचे आयोजन मुंबई विभागीय उप संचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांचे उपस्थितीत दि.31 जुलै, 2024 रोजी विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे सकाळी 11.30 वा. करण्यात आलेली आहे.

या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन प्रणाली व नव्याने समावेश करण्यात आलेल्या विशेष बाबींविषयी माहिती देण्यात येणार असून जिल्हास्तरिय स्पर्धांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजना, कार्यक्रम व उपक्रमांबाबतची माहितीही यावेळी देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजनांबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांचेकडून माहिती देण्यात येणार आहे.

दि. 31 जुलै, 2024 रोजी, विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी येथे सकाळी 11.30 वा. आयोजित बैठकीस नवी मुंबई महानगरपालिका शाळांसह शासन मान्यताप्राप्त खाजगी शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक तसेच विविध स्पोर्ट्स असोसिएशन व जिमखाना यांचे पदाधिकारी, शासन मान्यताप्राप्त विविध खेळांचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याबाबत क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

हिंदुस्थान समाचार / मेघा माने / हर्षदा गावकर


 rajesh pande