
मुंबई, 19 डिसेंबर (हिं.स.)।पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी करण्यात येणार आहे.याचवेळी पुरुष निवड समिती न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठीही संघ जाहीर करणार आहे. टी-20 विश्वचषकाचे आयोजन 7 फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समिती बोर्डाच्या मुख्यालयात बैठक घेणार असून, त्यानंतर दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली जाईल. या परिषदेत भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उपस्थित राहतील. भारतीय संघ शुक्रवारी अहमदाबाद येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादव थेट मुंबईला रवाना होतील.
भारतीय संघाला 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका देखील होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असण्याची शक्यता आहे. निवड समिती टी-20 विश्वचषकासोबतच न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही संघाची निवड करणार आहे. भारतीय संघ या जागतिक स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचे संरक्षण करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद यशस्वीपणे राखता आलेले नाही.
बहुतेक स्थानांसाठी दावेदार निश्चित झाले असले, तरी काही जागांसाठी अजूनही विचारमंथन सुरू आहे. उपकर्णधार शुभमन गिल यांची खराब फॉर्म ही संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाब ठरत आहे. गिल यांच्या समावेशामुळे संजू सॅमसनला मधल्या फळीत खेळवण्यात आले होते; मात्र गेल्या काही सामन्यांपासून तो अंतिम अकरामधूनही बाहेर आहे. याचबरोबर, दुखापतीमुळे शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या टी-20 सामन्यातही खेळू शकले नव्हते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode