अमरावती, 1 ऑगस्ट, (हिं.स.) नानाजी देशमुख कृषी संजीवनी-पोकरा व अन्य योजनेंतर्गत फळ, फूलशेती व पालेभाज्यांच्या अधिक उत्पन्नासाठी शेडनेट उभारण्याची योजना आहे. शेडनेट शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. केवळ १० गुंठ्यांमध्ये दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न घेता येते; मात्र जिल्ह्यात या योजनेला अल्प प्रतिसाद आहे.
बिगरहंगामी पिकांसाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. शेडनेट हा त्यातील चांगला उपक्रम ठरला आहे. अल्पभूधारक शेतकरी याचा वापर करून लाखो रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. शेडनेटची उभारणी २५ टक्के, ५० टक्के व ७५ टक्के या तीन प्रकारची असते. यातील पिकाला सावली व उन्हाचे संतुलित व नियंत्रित वातावरण निर्माण करून उत्पादन वाढवण्यासाठी फायदा होतो. शेतकरी सर्वाधिक उभारणी ५० टक्के शेडनेटची करतात.कारण ५० टक्के ऊन व ५० टक्के सावली निर्माण करून वातावरण नियंत्रित करण्यासाठी याचा फायदा होतो. या योजनेत ज्या शेतकऱ्यांनी अनुदान उचलले आहे. मात्र, अजून पर्यंत शेड नेट उभारले नाही अशांकडून आता वसुली होणार आहे. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या अन्य योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेडनेटचा लाभ दिला जात आहे. आकारमानानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.
अन्य योजनेतून दिला जातो लाभ
जिल्ह्यात पोकरा योजनेची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही; परंतु अन्य योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेडनेटचा लाभ दिला जातो; परंतु लाभ घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी / मेघा माने / हर्षदा गावकर