धुळे, 12 सप्टेंबर (हिं.स.)जिल्ह्यात खरीप हंगाम 2023-2024 (रब्बी) मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या हमीभावाने ज्वारी खरेदी करीता 31 ऑगस्ट,2024 पर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकरी नोंदणीचा ओघ लक्षात घेता आता नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी 30 सप्टेंबर,2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी आर.एस.इंगळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हा पणन अधिकारी श्री. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी पूर्ण न झाल्याने, ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी. या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहीत निकम व सर्व संचालक मंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली होती. त्या विनंतीस अनुसरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र शासनाकडे व्यक्तिंश: पाठपुरावा करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ज्वारी खरेदीसाठी 30 सप्टेंबर, 2024 पर्यंत मुदतवाढ मिळवुन दिली आहे.
यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव योजनेचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळुन आर्थिक फायदा होणार आहे. अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना ज्वारी विक्री करावयाची आहे, अशा शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा लाभ घेवून मुदतीत नोंदणी करण्याचे आवाहन ही जिल्हा पणन अधिकारी श्री.इंगळे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर