पुणे, 12 सप्टेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पसार झालेल्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत तीन अल्पवयीनांसह २१ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून आठ पिस्तूल, १३ काडतुसे, सात दुचाकी, मोटार जप्त करण्यात आली आहे. आंदेकर खून प्रकरणात मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, शुभम दहिभाते, आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, तिचा पती प्रकाश, दीर गणेश यांंना अटक करण्यात आली. याप्रकरणात कोयते, तसेच पिस्तूल पुरविणारा आरोपी संगम वाघमारेला नुकतीच अटक करण्यात आली होती. पसार झालेले आरोपी सागर पवार, साहिल दळवी यांना गुन्हे शाखेच्या युनिट एक आणि खंडणी विरोधी पथकाने अटक केली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, प्रताप मानकर, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, राहुल मखरे आणि पथकाने ही कारवाई केली.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु