अमरावती, 19 सप्टेंबर, (हिं.स.) बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत राज्यमार्ग जुना बायपास वरील हॉटेल लाली लॉन जवळ एका अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकी स्वारांना उडविले. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत तर एक किरकोळ जखमी झाला आहे.
रामेश्वर पकडे, प्रदीप पकडे व प्रदीप पारडे असे जखमींची नावे असून तिघेही राहणार जुनी वस्ती बारीपुरा बडनेरा येथील आहेत. हे स्प्लेंडर प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच 27 एजे 39 53 या दुचाकीने अमरावती वरून बडनेराकडे जात असताना यांना अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येऊन धडक दिली व घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाले. या अपघातात प्रदीप पकडे व प्रदीप पारडे गंभीरत्या जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटना स्थळी रवाना झाले असून अज्ञात वाहनाचा तपास सुरु केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी