रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : कोकण रेल्वेच्या मार्गावर आज चिपळूण स्थानकात प्रवाशांच्या सेवेसाठी एक नवे दालन खुले करण्यात आले. प्रवाशांसाठी एक्झिक्युटिव्ह लाऊंज व कॅशलेस तिकीट बुकिंग सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत ही सुविधा सुरू झाली. चिपळूण रेल्वे स्थानकाच्या पहिल्या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. या वातानुकूलित लाउंजमध्ये विविध प्रकारच्या आरामदायी २३ सोफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीच्या अपडेटसह येथे वाय फाय सुविधा, कॅन्टीन,सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रसाधनगृह अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. क्यू आर कोडच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे अदा करण्याची सुविधाही चिपळूण स्थानकात आजपासून सुरू करण्यात आली. चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते फीत कापून, कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या उपस्थितीत या सुविधांचा प्रारंभ झाला. यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे, मुख्य वाणिज्य प्रबंधक आशुतोष श्रीवास्तव, नागरिक, कोकण रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पूर्वी चिपळूण स्थानकात एक नवी सुविधा सुरू झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर