मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.)। समग्र शिक्षा अभियानातील सर्वच उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात यावेत. या अभियानात राज्याची उल्लेखनीय कामगिरी व्हावी, या दृष्टीने विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. या अभियानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण सुधारणा, तंत्रशिक्षणाचा प्रसार, डिजीटल शिक्षणाचे आयोजन, शिक्षकांसाठीच्या कार्यशाळा आणि प्रशिक्षण प्रभावीपणे राबवावेत, अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.
मंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला, राज्य प्रकल्प समन्वयक गोविंद कांबळे, उपसंचालक (वित्त) शार्दुल पाटील, उपसंचालक (प्रशासन) संजय डोर्लीकर, मुख्य अभियंता (प्रकल्प) हेमंतकुमार सावंत आदी उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी समग्र शिक्षा अभियानातील उपक्रम, योजनांचा लाभ प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्याला झाला पाहिजे. शाळांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जावेत. समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे संदेश ध्वनी रेकॉर्डद्वारे किंवा व्हीडिओ स्वरूपात मुलांना ऐकवावेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढेल.
शिक्षण क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करावा. यातून त्यांच्या कामाला नवी ऊर्जा मिळेल. या बरोबरच काही संस्थाही उल्लेखनीय काम करीत आहेत. त्यांच्या चांगल्या कामाची दखल शिक्षण विभागाने घेऊन त्यांचाही गौरव करावा. शिक्षण क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करावी, अशा सूचना मंत्री श्री. भुसे यांनी दिल्या.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, शाळेत आवश्यक भौतिक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यामध्ये शुद्ध पाणी, शौचालये, लाइटिंग, संगणक, ग्रंथालय आदी बाबींचा समावेश असावा. प्रत्येक शाळेत खेळ व क्रीडासाहित्य उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना द्यावी. इमारत दुरुस्ती, कंपाउंड वॉल यासारख्या कामांचे वर्गीकरण करावे. कंपाउंड वॉलचे काम एमआरईजीएस मधून घेण्याबाबतही व शाळा दुरुस्तीची काही कामे सामजिक उत्तरदायित्व निधीतून करण्यासाठी त्यांनी सूचना केल्या.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे यांनी बैठकीतून बोर्डी ता. अकोला शाळेतील मुख्याध्यापक उमेश चोरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून लर्निंग साहित्य वापराबाबत माहिती जाणून घेतली. शिक्षण विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या साहित्याचा मुलांना शिकवताना चांगला उपयोग होत असल्याचे उमेश चोरे यांनी यावेळी सांगितले. सर्व शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहात. शिक्षण विभाग शिक्षकांच्या सर्व अडचणी सोडवण्यास प्राधान्य देत आहे, असे मंत्री श्री. भुसे यांनी या संवादावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर